आज शाही दसरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज शाही दसरा
आज शाही दसरा

आज शाही दसरा

sakal_logo
By

आज शाही दसरा सोहळा

संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा उद्या (बुधवारी) दसरा चौकात होणार आहे. दसरा चौक मैदानात शामियाना उभा केला असून, सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरात विविध करमणुकीची साधने, खेळण्याची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दाखल झाले असून, या परिसराला यात्रेचे स्वरूप येणार आहे.
सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी दसरा चौकात सोने लुटण्याचा (शमीपूजन) कार्यक्रम होईल. तत्पूर्वी, पाचच्या सुमारास भवानी मंडपातून लवाजम्यासह श्री तुळजाभवानीची पालखी सोहळ्यासाठी बाहेर पडेल. याबरोबर श्री अंबाबाई, श्री गुरुमहाराज यांच्या पालख्याही परंपरेनुसार दसरा चौकात येतील. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे, यशराजराजे यांचे न्यू पॅलेस येथून मेबॅक गाडीतून दसरा चौकात आगमन होईल. त्यानंतर शमीपूजन होऊन सीमोल्लंघनाचा सोहळा होईल. सोहळ्यानंतर परंपरेनुसार श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगर, शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीम, गंगावेस परिसरातून फिरून पुन्हा मंदिरात जाईल.
दरम्यान, यंदाच्या शाही दसरा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरावा, यासाठी पारंपरिक लवाजम्याबरोबरच भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. विविध विषयांवरील चित्ररथ, लेझीम, ढोलपथक, धनगरी ढोल, गजनृत्य, मल्लखांब, कुस्तीची प्रात्यक्षिके, पोवाडा आदी लोककला यावेळी सादर होतील. रस्त्याच्या दुतर्फा ‘एनसीसी’चे विद्यार्थी पुष्पवृष्टी करतील.
....
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील विविध मंदिरांवर दत्तात्रय देसाई यांच्यावतीने उद्या (बुधवारी) हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. सकाळी अकरा वाजता कराड येथून या उपक्रमाला प्रारंभ होईल. सातारा जिल्ह्यातील यमाईदेवी, वाघजाईदेवीची विविध स्थाने, म्हसोबा मंदिर, भैरवनाथ मंदिर, सांगली जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ मंदिर, दत्त मंदिर (औदुंबर), कोल्हापूर जिल्ह्यातील येळवण जुगाई, लोळजाई आदी मंदिरांवर पुष्पवृष्टीनंतर सायंकाळी सव्वाचारला साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर पुष्पवृष्टी होईल.