शहर विकास आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर विकास आराखडा
शहर विकास आराखडा

शहर विकास आराखडा

sakal_logo
By

विकास आराखड्यासाठी चार निविदा
चेंडू प्रशासनाच्या कोर्टात; प्रक्रियेला गती देण्याची गरज
कोल्हापूर, ता. ६ ः नियमावलीचा अभाव, प्रतिसाद कमी, तसेच तांत्रिक बाबींची कमतरता यामुळे तिसऱ्या शहर विकास आराखड्यासाठी एजन्सी नेमण्याची चार वर्षांपासून लांबलेली प्रक्रिया आता पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पाचव्यांदा नियमावलीसह राबवलेल्या प्रक्रियेत चार कंपन्यांनी निविदा भरली आहे. ही एजन्सी नेमली गेल्यानंतर विकास आराखड्याच्या कामाला गती येणार आहे. त्यामुळे आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे.
२०१८ पासून या आराखड्याची प्रक्रिया सुरू झाली. मध्यंतरी कोरोनामुळे ती रखडली. त्यानंतर आराखड्यासाठी इएलयू (अस्तित्वातील जमिनीचा वापर) तसेच विविध तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी शासनाकडून पॅनेल तयार केले. त्यावेळी नियमावलीची स्पष्टता नव्हती. यामुळे आतापर्यंत चारवेळा निविदा मागवल्या असल्या तरी त्याला कमी प्रतिसाद, तांत्रिक अर्हता नाही, अशा कारणांनी ती प्रक्रिया लांबत गेली. आता शासनाने महापालिकेसाठी एजन्सी नेमताना आवश्‍यक नियम केले. त्यामुळे प्रक्रिया राबवणे सोपे झाले आहे. यानुसार गेल्या महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली. चार कंपन्यांनी ही निविदा भरली आहे. त्यांची छाननी होऊन, दर पाहून त्यातील कंपनी अंतिम केली जाणार आहे.
गेल्या वर्षीपासून शहर विकास आराखड्यासाठी स्वतंत्र अधिकारी, कार्यालय सुरू झाले. त्यांच्याकडून इएलयुसाठी लागणारी बेसिक माहिती संकलित केली आहे. एजन्सी निश्‍चित झाली की त्यांच्याकडून सॅटेलाईट इमेज, विविध सर्वेक्षण केले जाईल. त्यातून इएलयू निश्‍चित केला जाईल. त्यामुळे आता एजन्सी लवकर नियुक्त होणे बाकी असल्याने प्रशासनाने त्यासाठी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे.
----------------
कोट
‘इएलयूसाठी लागणारी मूलभूत माहिती संकलित करून ठेवली आहे. आवश्‍यक कर्मचारीही आहेत. अत्याधुनिक पद्धतीने काम केले जाणार असल्याने एकदा प्रक्रिया सुरू झाली की आराखड्याला फार वेळ लागणार नाही.
- धनंजय खोत, उपसंचालक, नगररचना
----------------

‘दुसऱ्या विकास योजनेनुसार अजूनही काम केले जात आहे. त्यात काही त्रुटी आहेत. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता सुविधांसाठी जागा, रस्त्यांचे नियोजन करणे गरजेचे बनले आहे. तिसऱ्या योजनेचे काम लवकर सुरू होण्याची आवश्‍यकता आहे.’
- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रीडाई, कोल्हापूर