आजरा ः शेतकऱ्यांचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः शेतकऱ्यांचा मोर्चा
आजरा ः शेतकऱ्यांचा मोर्चा

आजरा ः शेतकऱ्यांचा मोर्चा

sakal_logo
By

54820
आजरा ः येथील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. (छायाचित्र ः श्रीकांत देसाई, आजरा)
------------------
आधी पुनर्वसनाचे बघा, मगच काम करा

संकेश्वर-बांदा महामार्ग प्रकल्पग्रस्तांचा आजरा तहसीलवर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ६ ः शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता संकेश्वर-बांदा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याकडील झाडे तोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या बाजूकडील शेतकरी याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यांना रस्ता कुठून जाणार याची माहिती नाही. त्यामुळे आधी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचे बघा, मगच रस्त्याचे काम करा, अशी मागणी संकेश्वर-बांदा महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढून आजरा-आंबोली मार्गावर रास्ता रोको केला. महामार्गाचे काम सुरू असताना शेतकरी बेदखल केला जात असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. रामतीर्थ फाटा ते तहसील कार्यालय असा मोर्चा झाला. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, यासह घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना संकेश्वर-बांदा महामार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे शिवाजी गुरव म्हणाले की, संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावरील झाडे हटवली जात आहेत. ही झाडे तोडताना रस्त्याकडील शेतकऱ्यांना कोणतीही सूचना दिलेली नाही. मुळात या रस्त्याबाबत रस्ते विकास प्राधिकरणाने स्पष्टोक्ती केलेली दिसत नाही. रस्त्याला आमचा विरोध नाही; पण या रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. याबाबत निर्णय न झाल्यास आम्ही कोणालाही शेतात पाय ठेवू देणार नाही. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मोर्चात माजी सभापती निवृत्ती कांबळे, संजय घाटगे, गणपतराव डोंगरे, आप्पासो पाटील, शिवाजी इंगळे, जयवंत थोरवतकर, आनंदा येसणे, सुरेश खोराटे, अनिकेत कवळेकर, दत्तात्रय मोहिते यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती; पण शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.