ऊस परिषदेनंतर कारखाना चालकांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस परिषदेनंतर कारखाना चालकांची बैठक
ऊस परिषदेनंतर कारखाना चालकांची बैठक

ऊस परिषदेनंतर कारखाना चालकांची बैठक

sakal_logo
By

गाळपप्रश्नी कारखानदारांची
बैठक ऊस परिषदेनंतर


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. दरम्यान, गळीत हंगाम संपल्यानंतरच एफआरपीचा दर ठरवला जाणार असल्याने पहिला हप्ता किती द्यायचा, तसेच जिल्ह्यातील गाळप कधीपासून सुरू करायचे यासंदर्भात जिल्हा बॅंकेत सर्व कारखानदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलली आहे. ही बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शनिवारी (ता. १५) होणाऱ्या ऊस परिषदेनंतर घेतली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एक रकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील यांच्यासह इतर कारखान्यांनी केली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली आंदोलने रद्द करावीत. शेतकऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करू नये, असे आवाहन केले होते. दरम्यान, आज गळीत हंगामाला कधीपासून सुरुवात करायची तसेच एक रकमी एफआरपी देण्याबाबत चर्चा होणार होती; पण ही बैठक ऊस परिषदेनंतरच घेण्याबाबत काहींनी मत व्यक्त केले.
यंदाच्या गळीत हंगामात सर्वच साखर कारखाने एक रकमी एफआरपी देण्यास तयार आहेत. त्यानुसार सर्वांसमवेत ही घोषणा केली जाणार आहे. तसेच, साखर कारखान्यांसाठी ऊसतोड कधीपासून करायची याबद्दलही चर्चा करून त्यादृष्टीने नियोजन आखले जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी (ता. १५) ऊस परिषद होत आहे. यामध्ये कोणता निर्णय घेतला जातो. त्यानंतर साखर कारखानदार आपली भूमिका स्पष्ट करतील. यातून तोडगा काढून गळीत हंगाम सुरु केला जाणार आहे. दरम्यान, स्वाभिमानीने मागणी केलेली एकरकमी एफआरपीबद्दलची भूमिका याआधीच कारखान्यांनी मान्य केली आहे.