कोजागिरी लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोजागिरी लेख
कोजागिरी लेख

कोजागिरी लेख

sakal_logo
By

भगवंताची रासलीला
आज अश्विन पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमा... चंद्रप्रकाशात ठेवलेल्या सुगंधी दुधाचा आस्वाद घेत तितक्याच अवीट गोडीची भगवंताची रासलीला अनुभवण्याची ही रात्र... त्याच रासलीलेविषयी...
- सुहास लिमये
-------------

भगवंताच्या प्राप्तीसाठी नाम, रूप, गुण आणि लीला अशा चढत्या क्रमाने जाण्याची एक पद्धत आहे. हे सर्व एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत.
कानाने शब्द ऐकावा
भावबुद्धीने अर्थ घ्यावा
अंतःकरणाने जाणावा
असा याचा क्रम आहे. अर्थातच, रासलीलेचे श्रवण करण्याचा अधिकार ज्याचे मन शुद्ध आणि स्थिर आहे, बुद्धी कुशाग्र आहे आणि अंतःकरण पवित्र आहे अशांनाच आहे. भगवंताची ही लीला माऊलींच्या भाषेत ‘वोळखे जो जगी । तो विवेकिया ॥’ अशा विवेकसंपन्न भक्तांसाठी आहे. लीलारहस्य जाणणाऱ्यांचे स्वतःचे जीवन समर्पित, शुद्ध व विचारप्रधान असावे लागते.
श्रीमद्‍भगवतातील दशम स्कंधातील २९ ते ३३ क्रमांकाच्या अध्यायांना ‘रासपंचाध्यायी’ म्हणून संबोधले जाते. रासलीला ही अप्राकृतिक, अचिंत्य, अलौकिक व भावगम्यलीला आहे.
ही अनुकरणीय नसून, एकांतिक चिंतनात अनुभवण्याची लीला आहे.

* रासलीला ही लौकिक कामावर विजय मिळविणारी अलौकिक कामकथा आहे. अलौकिक कामलीलेतून अकाम, अपौरुषेय असणाऱ्या परमात्म्याने केलेल्या लौकिक कामविकारांच्या पराजयाची लीला आहे.
* भगवान, वीतरागशिरोमणी श्रीशुकाचार्यांसारखे महात्मे आसन्नमरण असणाऱ्या विरक्त राजर्षी परीक्षितींना ही कथा सांगत आहेत, हे लक्षात घेऊन रासलीला चिंतनात प्रवृत्त व्हावे. तत्पूर्वी, काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
१) रासलीलासमयी भगवान श्रीकृष्ण केवळ आठ वर्षांचे आहेत.
२) प्रभू ही लीला अस्खलित, अवरुद्ध सौरत राहून उर्ध्वरेतस स्वरूपाने करतात.
३) जितक्या गोपी, तितकी रूपे प्रभूंनी धारण केली, हे सामान्य विषयभोगी जीवाला शक्य नाही.
४) या लीलेत गोपिका गुणमयी स्थूलदेहाचा त्याग करून दिव्य देह धारण करून आल्या आहेत. त्यांचा स्थूलदेह घरी परिवारजनांबरोबरच होता.
५) भगवान श्रीकृष्ण गुप्तरूपाने व अत्यंत मर्यादापूर्वक ही लीला करतात. ज्याचा अनुभव केवळ अधिकारी, आवाहित गोपिकांना व ही लीला जाणण्यायोग्य परम भगवद्‍भक्तांनाच प्राप्त झाला, इतरांना नाही.
६) भगवद्‍ निंदक शिशुपालाने राजसभेत राजसूययज्ञप्रसंगी अनेक दोषारोप केले. परंतु, त्यात दुरान्वयानेही रासक्रीडेचा दोषरूप उल्लेख नाही.

* ही लीला तर्काने कळत नाही. कारण, ही आत्मस्वरूपात अविरोध रतिप्राप्त करण्यात रममाण होण्याची लीला आहे.
भगवंताने रासलीला करताना योगमायेचा आश्रय घेतला; पण तिला ताब्यात ठेवून. अंतःकरणातील इच्छा म्हणजे माया. आपणही मायेचा आधार घेतो. परंतु, तिला ताब्यात ठेवू शकत नाही. येथे भगवंताने योगमायेचा आधार घेऊन फक्त एकच कर्म केले, ते म्हणजे वेणूवादन!

भगवंताचे काय किंवा संतांचे काय, संकल्प हीच परिपूर्ती असते. येथे गोपिकांना ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणे इतकाच संकल्प भगवंताने केला आहे.
गोपिकांच्या अंतःकरणात भगवंताविषयी असणारे विशुद्ध प्रेम यालाच येथे काम असे म्हटले आहे आणि याच कामाची पूर्ती अर्थात पूर्णब्रह्माची प्राप्ती हीच रासलीला होय. भक्तशिरोमणी संत नामदेवरायांनी याचे अत्यंत अचूक आणि यथार्थ वर्णन त्यांच्या बालक्रीडेच्या अभंगात केले आहे. नामदेवराय म्हणतात-
धन्य त्या गोपिका, धन्य त्यांचे पुण्य ।
भोगिताती कृष्ण पूर्णब्रह्म ॥
नामा म्हणे होय कामाची ते पूर्ती ।
नव्हे वीर्यच्युती गोविंदाची ॥
भक्ती म्हणजे भगवंताविषयी असलेले परम प्रेम... सा त्वस्मिन् परम प्रेमरूपा । भक्तिशास्त्राचा कलश म्हणजे रासलीला. आजच्या दिवशी याचे यथार्थ चिंतन आपणा सर्वांकडून घडावे, आपली भक्ती पूर्णत्वाला जावी आणि आपणास अखंड ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी, हीच त्या बालमुकुंदाच्या चरणी प्रार्थना करतो.