पालकमंत्री दीपक केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री दीपक केसरकर
पालकमंत्री दीपक केसरकर

पालकमंत्री दीपक केसरकर

sakal_logo
By

‘धनुष्यबाण’ शिंदे गटालाच मिळेल

पालकमंत्री दीपक केसरकर; बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना आमचीच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ ः शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची, आम्ही त्यांच्याच विचारांचे आहोत. त्यामुळे आज ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठले असले तरी आमच्याकडचे बहुमत पाहता हे चिन्ह मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वास पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाने आज शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आलेले पालकमंत्री केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. ते म्हणाले, यापूर्वी भाजप-शिवसेना युती म्हणून लढलो. तीच युती आम्ही आता कायम ठेवलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत. आमच्यासोबत ४० आमदार १२ खासदार पक्षाचे आहेत. एका आमदाराला अडीच ते तीन लाख, तर खासदाराला पंचवीस लाख लोक मतदान करतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या आमच्या दसरा मेळाव्याला पावणेतीन लाख लोक उपस्थित होते. त्यामुळे मूळ शिवसेना ही आमचीचच आहे. हा आमचा दावा कायम असून, निवडणूक आयोगासमोर तो आम्ही करणार आहोत. बहुमताची दखल घेऊन चिन्ह आम्हालाच मिळेल.

पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘आयोगाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक नाही. पक्षाचे ७० टक्के लोकप्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार कोणाचा द्यायचा याचा निर्णय आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस घेतील. या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची मुदत अजून लांब आहे. तोपर्यंत याचा निर्णय होईल. मी जे बोलतो ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच बोलतो. माझे मत ठाम असते.चिन्हाचा निर्णय हा पोटनिवडणुकीपुरता आहे. भविष्यात आम्ही आयोगासमोर आमचीच खरी शिवसेना आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह मिळावे, असा दावा करू. आमच्या दाव्याची दखल आयोग घेईल. शिवसेना ही बाळेसाहेब ठाकरेंच्या विचारापासून दूर गेलेल्यांची नाही. म्हणूनच हे चिन्ह कदाचित गोठवले गेले असेल.
-------
बनावट प्रतिज्ञापत्र सापडले
आम्ही शिवसैनिक असल्याचे काही बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. तशी बोगस प्रतिज्ञापत्रे सापडल्याचे समजते. प्रतिज्ञापत्र करताना संबधित व्यक्ती, वकील हजर असावा लागतो, मात्र ते न करता ही प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात आल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
-------