दिव्यांगांची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांची प्रतीक्षा
दिव्यांगांची प्रतीक्षा

दिव्यांगांची प्रतीक्षा

sakal_logo
By

दिव्यांगांच्या मदतीकडे पाठ
चार वर्षे साधने, दीड वर्ष अनुदान नाही; राज्य, महापालिकेचा निधी नाही, २२०० बांधव प्रतीक्षेत
उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी धोरण निश्‍चित केलेल्या राज्य सरकार व महापालिकेने कोरोनानंतर दिव्यांगांच्या मदतीकडे पाठ फिरवली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्यासाठी २०१९ पासून निधीच आलेला नाही. तर दीड वर्षापासून दिव्यांगांना वितरित करायचे जवळपास साडेसहा कोटींचे अनुदान महापालिकेकडून प्रलंबित आहे. यामुळे शहरातील २२०० दिव्यांग बांधवांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हिलचेअर, तीनचाकी, चष्मा, श्रवणयंत्र अशा विविध साधनांची मदत केली जाते. १५०० दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्यातील गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी साहित्यासाठी मागणी घेतली जाते. त्यांची तपासणी करून निवड करून साधनांसाठीचे मोजमाप घेतले जाते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे त्याची मागणी केली जाते. परिषदेकडून आलेला निधी कंपनीकडे पाठवून साधने घेतली जातात; पण २०१९ पासून निधीच नाही. २०२१ मध्ये शिबिर होऊन गरज असलेल्या मुलांचे अडीच लाखांच्या साधनासाठी मोजमाप झाले आहे. निधी नसल्याने ९८ च्या आसपास मुले साधनांच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षाला ३० ते ३४ लाखांचा निधी या विभागाकडे परिषदेकडून येतो. त्यात आठ कर्मचाऱ्यांच्या पगाराचा समावेश आहे. कोरोनापूर्वी दरवर्षी साडेतीन ते चार लाखांची साधने वितरित केली जात होती. चार वर्षे होत आली असून निधीचे वितरणच झालेले नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग मुलांच्या पालकांनी काहीतरी तजवीज करत अडथळ्यांवर मात करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
-------------
चौकट
साडेसहा कोटी मिळणार केव्हा?
शहरात २२०० प्रमाणपत्रधारक दिव्यांगांची नोंदणी महापालिकेकडे झाली आहे. त्यांच्यासाठी महापालिकेच्या निधीतून दरवर्षी ठराविक रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. त्यासाठी त्या-त्या वर्षी अनुदानाचा आराखडा निश्‍चित केला जातो. गेल्यावर्षी उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता, तसेच अन्य कारणांमुळे निधी अखर्चित राहिला. प्रशासनाने तो यंदाच्या अनुदानासोबत देण्याचे निश्‍चित केले. त्यामुळे सहा कोटी ४६ लाखांचे अनुदान प्रस्तावित केले आहे. त्यामुळे वर्गवारी करून शंभर टक्के दिव्यांग असलेल्या तीन प्रवर्गांना १५००, तसेच इतरांना १००० अशी रक्कम ठरवली गेली आहे. दिवाळीपूर्वी हा निधी दिला जातो; पण आता दिवाळीचे वातावरण बाजारात सुरू झाले तरी निधी नसल्याने दिव्यांग बांधव अस्वस्थ झाले आहेत. मंजुरी केव्हा होणार, मग निधी केव्हा मिळणार, याकडे डोळे लागले आहेत.
------------
कोट
गेल्यावर्षीचे मार्चपर्यंतचे अनुदान दिले. त्यानंतर शिलकीसह यंदाच्या अनुदानाचा आराखडा अंतिम झाला असून, मंजुरीच्या टप्प्यात आहे. दिवाळीपूर्वी हे अनुदान वितरित करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत संघटनांसोबत बैठक घेतली आहे. इतर मागण्यांबाबतही प्रक्रिया सुरू आहे.
- रविकांत आडसूळ, उपायुक्त, महापालिका