डॉ. लवटे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. लवटे सत्कार
डॉ. लवटे सत्कार

डॉ. लवटे सत्कार

sakal_logo
By

फोटो ः एल ५५३९७ व 55398
......

डॉ. लवटेंच्या कार्यातून संत कबीरांची आठवण
---
डॉ. दामोदर खडसे; नागरी सत्कारप्रसंगी कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या नऊ ग्रंथांचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः संघर्षमय जीवन वाट्याला येऊनही डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी समाजसेवक, शिक्षक, लेखक, अनुवादक म्हणून यशस्वी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल कोल्हापुरातच नव्हे, तर देशभरात सन्मानपूर्वक घेतली जाते. समाजातून त्यांना अवहेलना वाट्याला आली, तरीही ते समाजासाठी सतत काही तरी चांगले देत राहिले. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व व कार्य संत कबीरांची आठवण करून देते, अशा शब्दांत पंतप्रधानांचे भाषा सल्लागार डॉ. दामोदर खडसे यांनी डॉ. लवटे यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ. लवटे यांनी ७२ वर्षांच्या संघर्षमय जीवनात सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. याची दखल घेऊन कोल्हापूरकरांतर्फे डॉ. सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार समितीतर्फे डॉ. लवटे व त्यांच्या पत्नी रेखा यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी डॉ. लवटे यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या नऊ ग्रंथांचे प्रकाशन झाले. या वेळी डॉ. खडसे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.
डॉ. खडसे म्हणाले, की ज्या व्यक्तीची समाजाकडून अवहेलना होते, त्या व्यक्तीत समाजाविषयी द्वेष, विद्रोहाची भावना तयार होते. हा मानसशास्त्रातील सिद्धांत डॉ. लवटे यांनी आपल्या यशस्वी कार्यातून बदलवून दाखविला. समाजसेवक म्हणून वंचितांविषयी त्यांना ममत्व आहे. शिक्षक म्हणून प्रोत्साहनाची ते भूमिका घेतात. अनुवादक म्हणून वि. स. खांडेकरांचे साहित्य देशभर त्यांनी पोचविले. त्यामुळे खांडेकरांचे साहित्य हे आपले साहित्य अशी भावना गुजरात, राजस्‍थानपासून तमिळनाडूपर्यंत आज पोचली. त्याचे श्रेय डॉ. लवटेंनाच आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. लवटे म्‍हणाले, की मराठी भाषेतील अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हिंदीत अनुवादित झाला. तो हिंदी भाषिक राज्यांत रुजू लागला. त्या अनुवादाने मला ओळख दिली. त्याबरोबरच समाजसेवा, शैक्षणिक कार्य, वस्तुसंग्रहालयाचे कार्य हे माझ्या एकट्याचे नसून, ते सामुदायिक आहे. त्या समुदायाचा प्रतिनिधी म्हणून हा सत्कार मी स्वीकारत आहे.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, की डॉ. लवटे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्य व आचरणात महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांच्या मूल्यांचे दर्शन घडते. असा माणूस आपल्या पिढीतील आहे, याचा अभिमान आहे. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सागर बगाडे यांनी मानपत्र वाचन केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.
....
ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची मागणी
सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. पी. माळी यांनी प्रास्ताविकात डॉ. लवटे यांच्या शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली.
........

माणुसकीच्या भावनेने एकत्र यावे
सध्याच्या राजकीय परस्थितीवर डॉ. लवटे यांनी भाष्य केले. ते म्‍हणाले, की या देशात मानवेंद्रनाथ रॉय यांचे विचार आचरणात आणले असते तर काँग्रेसला आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. समाजात लोकशाही, समता, बंधुता, स्वातंत्र्य वाढीस लागावे, अशा प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी टोकाच्या जातीभेदापलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेने एकत्र येत समाजाला पुढे नेण्याची गरज आहे. ज्या देशात संरक्षणावरील खर्च कमी होतो, सभ्यता व संयम वाढीस लागतो, तोच देश महासत्ता होऊ शकतो.