सुत दरात प्रतिकिलो १५ रुपये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुत दरात प्रतिकिलो १५ रुपये वाढ
सुत दरात प्रतिकिलो १५ रुपये वाढ

सुत दरात प्रतिकिलो १५ रुपये वाढ

sakal_logo
By

सूत दरात प्रतिकिलो १५ रुपये वाढ
परतीच्या पावसाचा कापूस पिकाला फटका बसल्याचा परिणाम
इचलकरंजी, ता. १२ : परतीच्या पावसाचा फटका कापूस पिकाला बसत आहे. हा पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास सूतगिरण्यांना कापसाची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. परिणामी, या परिस्‍थितीचा गैरफायदा घेण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली असून तीन दिवसांत सूत दरात प्रतिकिलो १५ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे शासन पातळीवर अद्याप प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हालचाली होत नसल्यामुळे यंत्रमाग उद्योगात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या पावसाळ्यातही इतक्या जोरदारपणे पाऊस कोसळला नाही. मात्र ढगफुटीसदृश पाऊस सर्वत्र होत आहे. त्याचा फटका अनेक पिकांना बसत आहे. त्याचप्रमाणे कापसालाही या पावसाचा फटका बसत असल्याची माहिती समोर येत आहे. पाऊस पुढील काही दिवस असाच कोसळत राहिल्यास कापसाची तोडणी लांबणीवर पडली आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात कापूस खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे बाजारात कापूस येण्यास विलंब होणार आहे.
परिणामी, सूतगिरण्यांना वेळेत कापूस मिळण्याची शक्यता कमी आहे. या नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेणारी या साखळीतील यंत्रणा सक्रिय झाल्याचे समोर येत आहे. कोणतेही कारण नसताना कापूस वेळेत उपलब्ध होणार नसल्यामुळे सूताची टंचाई निर्माण होणार असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. परिणामी, गेल्या तीन दिवसांत प्रतिकिलो १५ रुपयांची सूत दरात वाढ झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांचे पुन्हा एकदा आर्थिक नियोजन बिघडण्याची चिन्हे आहेत.
----------
वीज सवलत बंद होण्याची भीती
राज्य शासनाकडून यंत्रमाग उद्योगाला वीज सवलत दिली जाते. त्यापोटी राज्य शासनाच्या अर्थ खात्याकडून ऊर्जा खात्याला निधी दिला जातो. पण हा निधी प्रलंबित पडला आहे. त्यामुळे ऊर्जा खात्याकडून यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे दोन्ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यानंतरही या दोन खात्यातील असमन्वय सातत्याने समोर येत आहे.
---------
चंद्रकांतदादा बैठक कधी घेणार?
यंत्रमागधारकांसाठीची अतिरिक्त वीज सवलत, व्याज अनुदानाचे प्रलंबित प्रश्न, पोकळ वीज बिलाचा गुंता असे विविध प्रलंबित प्रश्न आहेत. त्यावर दसरा झाल्यानंतर व दिवाळीपूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले होते. पण अद्याप त्याबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नाही. याबाबत त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. पण त्यांच्या पातळीवरून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले.