लम्पी मदतीसाठीचे ७८ अर्ज वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पी मदतीसाठीचे ७८ अर्ज वैध
लम्पी मदतीसाठीचे ७८ अर्ज वैध

लम्पी मदतीसाठीचे ७८ अर्ज वैध

sakal_logo
By

लम्पी मदतीसाठीचे ७८ अर्ज वैध
हातकणंगले तालुका; अध्यादेशापूर्वी मृत जनावरांना मदत मिळणार?

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १२ : हातकणंगले तालुक्यात प्रथम इचलकरंजी येथील लम्पीमुळे मृत्यू झालेल्या पशुपालकास मदत वितरित केली आहे. तालुक्यामध्ये लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे पशुपालकांकडून ९० अर्ज दाखल केले आहेत. त्यामधील ७८ जनावरांच्या पशुपालकांचे अर्ज वैध ठरवले आहेत. अन्य अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या असून, त्या पूर्ण केल्यानंतर त्यांचेही अर्ज वैध ठरणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मदतीचा अद्यादेश येण्याआधी मृत झालेल्या जनावरांना मदत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
इचलकरंजी शहरात लम्पी संक्रमित जनावरे मोठ्या प्रमाणात आढळली होती. त्यामधील बहुतांशी जनावरे योग्य उपचार मिळाल्याने लम्पीमुक्त झाली. मात्र, जी जनावरे कुपोषित, रोगप्रतिकारक्षमता कमी, पशुपालकांकडून उपचाराबाबत झालेली दिरंगाई यामुळे काही जनावरे मृत्यूमुखी पडली. यामध्ये बैल, दुधाळी गायींचा समावेश असल्याने पशुपालकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, मदत मिळविण्यासाठी ज्या पशुपालकांची जनावरे मृत झाली आहेत, त्यांनी याची माहिती दोन दिवसांत पशुवैद्यकीय दवाखान्यात देणे आवश्यक आहे. पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिसपाटील, तसेच दोन स्थानिक नागरिक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशू मृत्यूमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यावा, पंचनाम्यात जनावराचा मृत्यू लम्पीमुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख आवश्यक आहे. अहवाल तत्काळ अधिकाऱ्यां‍कडे सादर करावा, अशा अटी असल्याने काही पशुपालकांसमोर मदतीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या पालकांना मदत देण्याचा अध्यादेश प्रसिद्ध होण्यापूर्वी अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रथम या संसर्गाबाबत अधिक माहिती नसल्याने अनेकांनी घरगुती उपचार करण्यावर भर दिला होता. यामध्ये बराच कालावधी गेल्याने काही जनावरांचा मृत्यू झाला. या जनावरांची विल्हेवाट शेतकऱ्यांनी/पशुपालकांनी स्वत: लावली. त्याची कोठेही नोंद नसल्याने अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार का ? मिळणार असेल तर काय करावे, याबाबत ठोस माहिती नसल्याने त्यांच्यामध्ये संभ्रम आहे.
-------
राष्‍ट्रीय आपत्ती धोरणानुसार राज्य शासनाच्या अर्थसहाय्यातून ही मदत करण्यात येत आहे.
मृत जनावरांचा प्रकार* प्रती जनावर* मर्यादा
दुधाळ जनावरांसाठी*३० हजार* ३ जनावरांपर्यंत
ओढकाम करणारी जनावरे (बैल)* २५ हजार *३ जनावरांपर्यंत
वासरे*१६ हजार रुपये*६ लहान जनावरे
-------
मृत जनावरांच्या पालकांना मदतीचा शासन आदेश १६ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्या आधी मृत्यू झालेल्या जनावरांच्या पालकांना मदत मिळणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी जनावरांच्यावर उपचार सुरू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, केसपेपर असणे आवश्यक आहे.
- डॉ. रवींद्र जंगम, सहायक आयुक्त, हातकणंगले