पन्नास वर्षात पडला नाही इतका परतीच्या पावसाचा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्नास वर्षात पडला नाही
इतका परतीच्या पावसाचा दणका
पन्नास वर्षात पडला नाही इतका परतीच्या पावसाचा दणका

पन्नास वर्षात पडला नाही इतका परतीच्या पावसाचा दणका

sakal_logo
By

1903
सडोली खालसा ः परतीच्या पावसाने बुधवारी पुन्हा शेतकऱ्यांची दैना उडवून दिली. येथे मळणी केलेले भात गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची अशी तारांबळ उडाली. (राजू कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)

पन्नास वर्षांत पडला नाही
इतका परतीच्या पावसाचा दणका
राधानगरीतून विसर्ग सुरू, पंचगंगेच्या पातळीत पाच फुटांची वाढ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः परतीच्या पावसाने आज सायंकाळीही शहरासह जिल्ह्याला झोडपल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. कमी कालावधीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे दिवाळी खरेदीवर पाणी फिरले. पंचगंगा नदीची पाणी पातळी २४ तासांत पाच फुटांनी वाढली. इचलकरंजी, रुई व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले. राधानगरी धरणातून ८०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गेल्या ५० वर्षांत परतीचा पाऊस एवढा कधीच पडला नव्हता. वडणगे येथे आज सायंकाळी एका तासात तब्बल ६१ तर तुळशी धरणावर सायंकाळी तासाभरात तब्बल ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटमध्येही जुलैसारखी स्थिती पहावयास मिळत आहे.
जून ते सप्टेंबर पावसाळा समजला जातो. तसेच सरकार दरबारी जलसिंचन विभागात १ जुलै ते १५ ऑक्टोबर पावसाचा हंगाम मानला जातो. साधारण ऑक्टोबरमध्ये क्वचितच पाऊस होतो. तोही परतीचा असतो. यामध्ये दिवसभरात जिल्ह्यात सरासरी ५ ते १५ मिलिमीटर पाऊस होतो; मात्र आज चक्क ढगफुटी सदृश‍ परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत करून सोडले. आज दुपारी चारपर्यंत एक-दोन मिलिमीटर पावसाची नोंद होती. त्यानंतर पावसाने पर्जन्यमापन केंद्रावर कुंभी धरणावर ७०, गगनबावडा ३८, मांडुकली ५५ अशी नोंदी केल्या.
तुळशी धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी सव्वापाच वाजता विसर्ग १५० वरून ५०० क्युसेक करण्यात आला. कोल्हापूर पाटबंधारे विभागाने तुळशी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा दिला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून सकाळी सातपर्यंत जिल्ह्यात सरासरी २८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
दुपारी चारपर्यंत ऊन होते; मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण होऊन मुसळधार पावसाने दीड-दोन तासांत जनजीवन विस्कळीत केले. गांधीनगर, वडणगे परिसरासह कागल परिसरात पावसाने त्रेधा उडाली. परतीच्या पावसामुळे शहरासह जिल्ह्याला फटका बसला. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील परीख पूल आणि राजारामपुरी चौकात पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहनधारकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. कर्मचाऱ्यांना घरी जाताना कसरत करावी लागली. अनेकांना मिळेल त्या ठिकाणी थांबावे लागले. मलकापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे तासाभराने वीजपुरवठा आणि वाहतूक सुरळीत झाली.

पाऊस असा...
जिल्ह्यात सकाळी सातला संपलेल्या २४ तासात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा - हातकणंगले- ४६.७, शिरोळ -१२.२, पन्हाळा- ४७.३, शाहूवाडी- ३८.८, राधानगरी- २०.५, गगनबावडा- ६६.७, करवीर- ५०, कागल- २०.२ , गडहिंग्लज- ८.४, भुदरगड- १५.८, आजरा- ६.१, चंदगड- २.६.
धरणांतील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये असा - राधानगरी २३१.४६, तुळशी ९८.०५, वारणा ९७४.१९ , दूधगंगा ६३८.८५, कासारी ७६.४७, कडवी ७१.२४, कुंभी ७६.५६, पाटगाव १०४.९७, चिकोत्रा ४३.१२. जंगमहट्टी, जांबरे, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.