कोरोना सहाय्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना सहाय्य
कोरोना सहाय्य

कोरोना सहाय्य

sakal_logo
By

कोरोनातील ३५०० मृतांच्या
नातेवाईकांना साडेसतरा कोटी
साहाय्य अनुदान जमा; प्रशासनाने जपली बांधिलकी
उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : कोरोनाच्या महामारीत अनेकांना जीव गमवावे लागले. काहींचे आई-वडील तर काहींची मुले गेली. हा मोठा मानसिक धक्का असताना उपचारासाठी झालेल्या खर्चाचा मोठा बोजा कुटुंबात राहिलेल्यांच्या डोक्यावर होता. त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी राज्य शासनाने कोरोनाने निधन झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ५० हजार सानुग्रह साहाय्य देण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपत निधन झालेल्या ३५०० वर व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या नावावर आतापर्यंत साडेसतरा कोटी रुपयांचे साहाय्य जमा करण्यास मदत केली. त्यातून निराधार, सैरभैर झालेल्या कुटुंबीयांना आधार मिळाला.
राज्य शासनाने वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सांगितले होते. आधीच कोरोनामुळे घराला बसलेल्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न त्यांचे कुटुंबीय करत होते. अनेकांची कर्ती मुले गेली, त्या आई-वडिलांना दुःखातून बाहेर पडण्यासाठी भयंकर त्रास होत असताना सहाय्यासाठी अर्ज करायचा त्यांना माहितीही नव्हते. अशांसाठी मदत व्हावी म्हणून महापालिकेने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यातून १५० अर्ज महापालिकेने मोफत भरून दिले. तर शहर परिसरातून ५८५४ अर्ज दाखल झाले.
त्यांच्या कागदपत्रांची छाननी होऊन ४९१० व्यक्तींसाठी सहाय्य मंजूर झाले. त्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या बॅंकेच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार ३५०० जणांचे सहाय्य खात्यावर जमा झाले. जवळपास एक हजारावर व्यक्तींच्या संबंधितांच्या बॅंक खात्याबाबतची माहिती दुरूस्त केली जात आहे. तर ४५० अर्जांमध्ये अपुरी कागदपत्रे असल्याने महापालिकेनेच सुनावणी घेऊन त्यांच्याकडून कागदपत्रे जमा करून घेतली.
-------------
चौकट
महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद
शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. पण महापालिका प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपत वेगळा संदेश दिला. ज्या अर्जात त्रुटी होत्या, कागदपत्रे अपुरी होती, त्यांना फोन करून महापालिकेत बोलवून पूर्तता करून घेतली जात होती. आतापर्यंत शासकीय योजनेतील कामात जोपर्यंत कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत नाही, तोपर्यंत हातात पडत नसल्याचा अनुभव असलेल्या नागरिकांसाठी हा सुखद धक्का होता. घरातील व्यक्ती तर गेली पण महापालिकेने या पडत्या काळात आधार दिल्याची कृतज्ञतेची भावना नागरिकांमध्ये आहे. यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना तसेच उपायुक्त रविकांत आडसूळ व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली अंमलबजावणी महत्त्‍वाची ठरली. सरकारी यंत्रणांबाबतचे नागरिकांचे नकारात्मक मत या मोहिमेतून महापालिकेने सकारात्मक बनवले.