दिवाळी अभ्यंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी अभ्यंकर
दिवाळी अभ्यंकर

दिवाळी अभ्यंकर

sakal_logo
By

‘प्रवाही मेवाती घराणे’
गुरू पं. जसराज यांच्यामुळे मी घडलो. मेवाती घराण्याची गायकी पुढे नेताना जे करायचे ते उत्तम, परिपूर्णतेकडे झुकणारे करण्याचा प्रयत्न केला आणि व्यावहारिक लयकारी साधण्याचे कसब साधले आणि स्वतःला विकसित केले. जी गायकी, बंदिश करेन ती त्याच्याएवढीच सुंदर व्हायला हवी होती. ती झाली आणि जगानेही स्वीकारली. मी गायकीमधील माझे प्रारुप बांधण्याचे आव्हान स्वीकारले आणि पुर्णत्वास नेले...
- पं. संजीव अभ्यंकर

घराणं म्हणजे काय?- तर, कला ही दोन अधिक दोन म्हणजे चार अशी नसते. म्हणजे एक स्वरावली घेतली, तरी ती कशी सादर करायची, याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. एखादी व्यक्ती जोरकसपणे म्हणू शकते. एखादी व्यक्ती हळूवार म्हणू शकते तर एखादी व्यक्ती तीच स्वरावली लाघवी पद्धतीने म्हणू शकते.
उत्तम जेवणाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असते. कोल्हापूरच्या जेवणात थोडा तिखटावर भर असतो. आता मला मिरची आवडत नाही असे नाही. पण, मिरची खाणं हा काही माझा स्थायीभाव नाही. माझा स्थायीभाव आहे गोड खाणं. पण, कोल्हापुरला आल्यावर मी कधीतरी मिसळ खातो. प्रत्येक प्रांतात गेले की, त्यांच्या त्यांच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. तसेच कलेमध्ये सादरीकरणाचे विविध सांगीतिक दृष्टीकोन असतात. शास्त्रीय संगीतामध्ये रागाची मांडणी कशी करायची, याचा वेगवेगळा विचार म्हणजे घराणे.
घराण्यांची निर्मिती झाली तेव्हा कोणा एका मुळ पुरुषाच्या नावाशी ते जोडले गेले. किराणा घराणं म्हणजे, अब्दूल करीम खॉंसाहेब यांच्यापासून सुरू झाले. अल्लादिया खॉं साहेबांपासून जयपूर घराणं सुरू झालं. पण, या घराण्यांच्या मुळ पुरुषांनी त्यांच्या विचारांनुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या सौंदर्य कल्पनेनुसार, जी काही गायकी तयार केली, त्याला एका घराण्याचं नाव दिलं गेलं. चांगले कलावंत खूप आहेत पण, प्रतिभावंत कलाकार फार कमी आढळतात. कॉन्ट्रीब्युशन करणारे कलाकार कमी दिसतात. प्रतिभावान कलाकार, त्याला मिळालेल्या गायकीमध्ये भर घालून, आपल्या घराण्याला आणखीन समृद्ध करत असतात.
किराणा घराण्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पंडित भीमसेन जोशी यांची गायकी किराणा घराण्याचं एक रुप आहे. डॉ. प्रभा आत्रे यांची गायकी किराणा घराण्याचं एक वेगळं रुप आहे. अब्दूल करीम खॉं साहेबांच्या पद्धतीने गाणारे, त्या पद्धतीचा आवाज लावणारे, त्याच पद्धतीने मांडणी करणारे कलाकार, ही तिसरी स्ट्रीम म्हणावी लागेल. तसंच जयपूर घराण्याचही आहे. अल्लादिया खॉंसाहेबांपासून पुढे गेल्यानंतर अनेक प्रतिभावंत कलाकारांच गाणं ऐकलं की हे लक्षात येतं. किशोरीताई आमोणकरांची एक वेगळी स्ट्रीम आहे. पंडित मल्लिकार्जून मन्सूर यांची जयपूर घराण्याची वेगळी स्ट्रीम आहे. पण, तेही जयपूर घराणं आणि हेही जयपूर घराणंच.
तसेच मेवाती घराण्याचे मूळ पुरुष उस्ताद घग्गे नझीरखॉंसाहेब. त्या नंतर पंडित नथ्थूलालजी व पंडित चिमणलालजी. त्यानंतर पंडित मोतीरामजी व पंडित ज्योतीरामजी, त्यानंतर पंडित मणिरामजी अणि पंडित प्रतापनारायणजी व त्या नंतर पंडित जसराजजी.
मेवाती घराण्यात माझे गुरु पंडित जसराजजी हे, त्यांचे मोठे भाऊ पंडित मणिरामजी यांच्याकडे गाणं शिकले. पंडित मणिरामजी यांचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. गुरुजींचे मोठे भाऊ पंडित मणिरामजी हे गुरुजींच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. गुरुजी पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडिल वारले. त्यामुळे मोठ्या भावानेच गुरु आणि वडिल या दोन्ही भूमिका निभावल्या. त्यांच्याकडून जी गायकी गुरुजींकडे आली, त्यामध्ये गुरुजींनी खूप भर घातली. त्यामुळे ते गाणं वेगळचं आहे, असं वाटायला लागलं. ही मेवाती घराण्यातील पहिली उत्क्रांती होती. बाकीची घराणी तुलनेने जुनी आहेत. पण, गुरुजींकडे घराण्याची धुरा आली त्यावेळी गुरुजींनी त्यांच्या शैलीने व त्यांची जी सांगीतिक दृष्टी होती, त्याने गायकीमध्ये खूप भर घातली. म्हणजे, क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप आला, त्याच्याआधीही क्रिकेट खेळले जायचे. पण, रिव्हर्स स्वीप ही दृष्टीच वेगळी होती. त्याच्यावर ऑब्जेक्शनही घेतले गेले. नीट मरता आला नाही तर आऊट होईल, असे. पण, आता लोक अत्यंत तयारीने रिव्हर्स स्वीप मारतात. स्लीपच्या डोक्यावरून वरुन बॉल काढणे, हे क्रिकेटमध्ये फार उशिरा आले. आपण जुन्या लोकांना विचारले तर ते म्हणतील, ‘हे काय क्रिकेट आहे ?’ ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल गेला की, तो सोडलाच पाहिजे. पण आता फलंदाज शिताफीने स्लीप वरून चेंडूं मारतात. फलंदाजाची ही वेगळी दृष्टी असते.
तसेच आमच्या गुरुजींची सौंदर्यदृष्टी खूप प्रगत आणि काळाच्या पुढे होती. तुम्हाला एखादी वेगळी गायकी मांडायची असेल तर त्याला पूरक बंदिशी बांधाव्या लागतात. ती गरजच बनून जाते. म्हणून गुरुजींनी स्वत:च्या रचना तयार केल्या. सगळ्या घराण्यांचे मूळ स्त्रोत हे ग्वाल्हेर घराणे आहे. त्यामुळे पारंपरिक रचना आमच्या क्षेत्रामध्ये खूप गायल्या जातात. गुरुजींच्या आधी मेवाती घराण्यामध्ये पारंपरिक रचना गायल्या जाण्यावरच अधिक भर होता. ही गायकी ग्वाल्हेर घराण्याची ‘ऑफ शूट’ म्हणावी अशी होती. पण ती वेगळी होती म्हणूनच त्याला मेवाती घराणे म्हटले गेले . पण, गुरुजींची सौंदर्यदृष्टी आणखी वेगळी असल्यामुळे त्यांना बंदिशी बांधायची गरज वाटली. मग स्वत:च्या गाण्याला पूरक अशा रचना त्यांनी केल्या. क्रिकेटमध्ये बाहेरील टिम भारतात आल्यावर आपण आपल्याला उपयुक्त असे स्पीनिंग ट्रॅक बनवतो आणि आपण ऑस्ट्रेलियात गेलो की, तिकडचे लोक त्यांना उपयुक्त असा फास्ट ट्रॅक बनवतात तसेच.
गुरुजींनी मेवाती घराण्याच्या गायकीत सरगम युक्त लयकारीची भर घातली. शब्दांच्या नादाचा, आलापीमध्ये सुंदर ऊपयोग केला. मिंड खूप विविधतेने वापरली. तानांचा वापरही अत्यंत वैविध्याने केला.
मेवाती घराण्याची जी मूळची वैशिष्ठ्ये होती, ती गुरुजींनी कायम राखली. ती कोणती, तर मिंड. इंद्रधनुष्यासारखे दोन स्वर जोडणे याला म्हणतात मिंड. दोन स्वरांना कट्सनी जोडणे म्हणजे कण. मिंड आणि कणचा सौंदर्यपूर्ण वापर ही मेवाती घराण्याची खासियत. गुरुजींच्या आधीही हे होते. पण, गुरुजींनी त्यालाही मांडणीची वेगळी दृष्टी दिली. मींड, कण, सुरेलपणा, तिन्ही सप्तकाचा गाण्यामध्ये वापर ही मेवाती घराण्याची वैशिष्ठ्ये होती. खर्ज, मध्य आणि तार सप्तकाचा आमच्या गायकीमध्ये सततचा वापर असतो. गुरुजींच्या आधीही मेवाती घराण्यामध्ये तो होता. पण, गुरुजींनी त्यांच्या नजरेतून गायकीतील मूल्ये पुढे नेली.
ते सौंदर्याचे भोक्ते होते.म्हणजे त्यांना धोतरही सुंदर आणि स्वच्छ हवे. त्याचे काठही जरीचेच हवेत आणि ते नेसलेही पाहिजे अगदी परफेक्ट. राजस असं व्यक्तिमत्व होतं ते. जे करायचे ते चांगलेच. अर्धे-मुर्धे काही नाही. स्वरमंडल अनेकजण वाजवितात. पण गुरुजी स्वरमंडल अत्यंत नजाकतीने वाजवायचे. ते जे जे काही करतील ते सुंदर आणि परिपूर्णतेकडे झुकणारेच असायचे. स्टेजवरचा वावर नीट हवा. तीन चार तास लोक तुमच्याकडे पाहणार असतील, तर नीटच दिसायला पाहिजे. नीट राहण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. त्यात गुरुजींची व्याख्या अगदी राजस होती.
पूर्वी असे व्हायचे की, आमच्याकडे घराण्यात हे करत नाहीत, ते करत नाहीत, ते त्यांचं आहे, असा मतप्रवाह ठळक होता . पण, गुरुजी त्यात अडकले नाहीत. त्यांनी विविध सौंदर्य मूल्ये आपल्या नजरेतून गायकीत मांडली.
ते म्हणायचे, ‘‘बेटा इधर-उधरसे वैसा का वैसा लेनेसे गाना पॅची हो जाता हैं .’’ त्यात एकसंध विचार रहात नाही. तुमची प्रतिभाच तुम्हाला मार्ग दाखवत असते, असं ते मला सांगायचे. त्यांच्याकडे गाणे शिकल्यानंतर माझी बाहेर पडायची वेळ आली, तेव्हा ते म्हणाले, ‘तुझं गाणं वेगळं करण्यासाठी काही मुद्दाम प्रयत्न आणि घाई करु नकोस. तुझी प्रतिभाच करेल तुझं गाणं वेगळं. फक्त प्रतिभेला वेळ दे .
तयारीचा एलिमेंटही गुरुजींनी खूप ॲडव्हान्स केला. म्हणजे गळ्यातून काहीही निघत नाही असे नाही. त्याला काही मर्यादा नाहीत. डोक्यात आले की, गळ्यातून येणारच. यामुळे गाणं खूप वाईड होतं. बंधने राहत नाहीत. आम्ही हे करत नाही, ते करत नाही असं नाही. मला पटलं तर करतो. जमत-बिमत नाही असं काही नाही.
मेवाती घराण्याचे फाउंडेशन भक्तीरसप्रधान होते. त्याला पूरक असा गुरुजींनी हवेली संगीताचा अभ्यास केला. म्हणजे अष्टछाप कवी. सौराष्ट्राचा वल्लभ संप्रदाय. आपल्याकडे भागवत धर्म म्हटला की, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव, एकनाथ महाराज असे आपण म्हणतो. तसे तिकडे अष्टछाप कावीं चा वल्लभ संप्रदाय. त्यांचे शब्द आपल्या उत्तर हिंदूस्थानी संगीताला फार पूरक असतात. अतिशय लाघवी शब्द असतात ते. त्या शब्दांचा नादही खूप सुंदर असतो. गुरुजींनी या हवेली संगीताचा खूप अभ्यास केला. हवेली संगीत म्हणूनही स्वत: वेगळ्या चाली देऊन त्या ते गायले . पण, क्लासिकल बंदिशीमध्येही त्यांनी त्या शब्दांचा अतिशय नादमय पद्धतीने वापर केला. जसा स्वर एक नाद घेऊन येतो तसे शब्दही आपला नाद घेऊन येतात. या शब्दांच्या नादाचाही गुरुजींनी अतिशय समर्पक वापर केला. स्वरोच्चार कसे करावेत याचाही एक मापदंड निर्माण केला . मेवाती घराणे हे भक्तीरस प्रधान आहे. शृंगार रसही आहे त्याच्यामध्ये. पण, मधुरा भक्ती ही जास्त आहे. गुरुजींनी शृंगार रसही खूप गायिला. पण, त्याला राधाकृष्णाची जोड दिली. त्यामुळे त्याला आध्यात्मिक स्पर्श आहे. गाण्यांमध्ये एकच रस नसावा. जेवढे रस तुमच्या गाण्यामध्ये जास्त, तेवढे गाणे व्यापक होते. गुरुजींचं गाणं व्यापक होतं, सर्व रसांना न्याय देणारं. म्हणूनच तर ते रसराज पंडित जसराज म्हणून ओळखले जायचे. आणि ते खरचं होत. दहा वर्षे मी त्यांच्या सोबत होतो. चारशे मैफलींना मी स्वरसाथ केली आहे. पण रस नाही असे गुरुजींचे एकही गाणे मी एकलं नाही.
तुमच्याशी बोलताना स्वतःचं कौतुक स्वतःच करणं मला योग्य वाटत नाही पण माझ्या बाबतीत बोलायाचे तर मी पूर्वसंचित घेऊन जन्माला आलोय असे माझे बालपण पाहिले तर लक्षात येईल. मी” वंडरबॉय” म्हणून बारा-तेराव्या वर्षी ख्याल गायन करून सर्वांना चकित केले होते . मी गुरुजींकडे गेलो तेव्हा बाहेर मैफल करत होतो आणि बालकलाकार म्हणून अतिशय तयार गाणे मी गात होतो. गुरुजींनी माझे गाणे ऐकायच्या अगोदर पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, गंगुबाई हनगळ, पु. ल. देशपांडे, ज्योत्सनाबाई भोळे, पंडित वसंतराव देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी या सगळ्यांनी माझं गाणं समोर बसून ऐकलं होतं. भीमसेन जोशी माझे गाणं ऐकून म्हणाले (त्यावेळी मी १३ वर्षाचा होतो) की, हा ज्ञानेश्वरांच्या कुळातला आहे. हिराबाईंनी त्यांच्या घरी माझं तीनवेळा गाणं केलं. ‘पुलं’ही माझ्याबद्दल खूप बोलले. पु लं म्हणाले की "संजीव अभ्यंकर" हे नावच पुढे एक पदवी म्हणून वापरलं जाईल. आणि या सगळ्यांनी सांगितले की, हा गाण्यासाठी जन्माला आला आहे. याला पूर्णवेळ गाणंच करू द्या.
पहिली सहा वर्षे माझ्या आईने मला तयार केले. माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर एम.एस्सी. बायोकेमिस्ट्री होती आणि म्युझिकमध्ये तिने पीएच.डी. केली. प्रचलित व अप्रचलित रागांचा तिचा अभ्यास खूप मोठा होता. त्यामुळे घरातच एक मोठा गुरु माझ्याकडे होता. त्याचबरोबर सहा वर्षे मी पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे सरांकडे ग्वाल्हेर किराणा घराण्याची तालीम घेतली.
मी पंडित जसराजजींकडे शिकायला गेलो, त्याच्याआधी माझी आई त्यांच्याकडे गाणे शिकत होती. आणि माझा सांगितिक पिंड गुरुजींच्या गाण्याशी जुळतो म्हणून आईने मला गुरुजींकडे गाणे शिकायला पाठवले. माझी शालेय शिक्षणातील गुणवत्ता खूप चांगली होती. मी चार्टर्ड अकाऊंटंट किंवा इंजिनिअर सहज झालो असतो. गुरुजींनी माझ्या आई-बाबांना सांगितले की, हा पूर्ण वेळ कलेला वाहून घेणार असेल तरच मी त्याला गाणे शिकवेन.
आईने ग्रुम केल्यावर मी मैफल करायला लागलो. मैफल कशी मांडायची, हे आईच माझ्याकडून करुन घेऊ लागली. पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे म्हणजे ग्वाल्हेर किराणा घराण्याचे पुण्यातील अतिशय ज्येष्ठ गुरु. ते माझ्या आईचेही पहिले गुरु. त्यांच्याकडेही मी गाणं शिकलो. त्यांनी माझ्याकडून गायिकीचा छान दृष्टीकोन तयार करुन घेतला. अनेक राग मी त्यांच्याकडे शिकलो. त्यांनी आणि आईने मला अशा टप्प्यावर आणले की, मला गुरुजींचे गाणे कळेल. प्रत्येकाला पूर्वसंचित असतचं. ते माझं स्ट्रॉंग होतं. मला नक्कीच असं वाटतं की, मागच्या जन्माची माझी साधना खूप स्ट्रॉंग होती. पण म्हणून या जन्माचे कष्ट कमी पडले असे नाही. पण कष्टाचे फळ मात्र उत्तम मिळाले. गुणवत्ता कमी असेल तर खूप जास्त मेहनत करुन, खूप जास्त रियाज करुन एखाद्या व्यक्तीला यश मिळेलच असे नाही. गुणवत्तेला मेहनतीची जोड़ हे यशाचे सूत्र आहे.
गुरुजींनी मला प्रत्येक गोष्ट ‘स्पून फिडिंग’ करुन सांगितली नाही. कित्येक गोष्टी मी माझ्या observation मधून शिकलो. ही निरीक्षणाची कला आहे. एका प्रमाणाबाहेर गुरु शिकवू शकत नाहीत. गुरु वाट दाखवू शकतात. त्यामधून काय घ्यायचे ते त्यांच्या शिष्यामध्ये ताकद किती यावर अवलंबून असते आणि प्रत्येकजण आपापल्या परिने ते घेत असतो.
गुरुजींकडे शिकताना मला लक्षात आले की मी जर त्यांचा शिष्योत्तम असेन तरच ते मला सोबत ठेवतील . त्यासाठी आवाज जपलाच पाहिजे आणि तो हुकमी असावा. मग माझ्या लक्षात आलं की, दही, ताक, सफरचंद, केळं खाल्ले की, मला सर्दी होते. त्यामुळे बेस्ट टोन मिळत नाही. बटाटे वडे आणि समोसेही खाणे मी सोडून दिले. तळलेल्या पदार्थांची माझ्या घशाला एलर्जी आहे . त्यामुळे मी हे सर्व खाणं पंधराव्या वर्षीच मी सोडून दिले. गुरुजींना जिंकायचे तर आपल्या गाण्यानेच.
त्यांचं माझ्या गाण्यावर प्रेम होतं. कितीतरी वेळा ते म्हणायचे, ‘कितना मीठा गाना गाते हो बेटा तुम .’ माझ्या सुरेलपणावर पण प्रचंड प्रेम होतं त्यांचं. तर माझ्या गाण्यानं त्यांना जिंकण्यासाठी त्या वयात मी खूप मेहतन घेतली. तीन वेळचा रियाज मी कधीच बुडवला नाही. दहावीनंतर माझा आवाज बदलल्यावर तीन सेशनमध्ये मी रियाज करायचो.
त्यावेळी आई-बाबांबी मला सांगितले होते, की तुला गुरुजींसारखं गायचं आहे. त्यापेक्षा वर काहीच नाही. मी फक्त 14 वर्षांचा होतो. गुरुजी हेच मापदंड होते. म्हणजे, चित्रपट क्षेत्रात लताबाईंची आठवण आली म्हणजे, झालं ना? चित्रपटसृष्टीत सर्वोच्च काय तर ते लता मंगेशकर. तसंच हे. वयाच्या चौदाव्या वर्षी टार्गेट काय तर गुरुजींसारखं गा म्हणजे झालं सर्वोच्च शिखर. या टप्प्यावर मी तेवीस- चौविसाव्या वर्षीच आलो. माझे गुरुजी गातायत की, मी गातोय हे त्यांनाही कळेनासे झाले. ते म्हणायचे, ‘कुठं माझा आवाज थांबतो आणि तुझा सुरु होतो, हे लक्षातही येत नाही.’ इतकी एकतानता, एकरुपता होती. याच टप्प्यावर एक व्यावसायिक म्हणून बाहेर सगळीकडे माझे कार्यक्रम सुरु झाले. मी प्रतिभा घेऊन जन्माला आल्यामुळे मी जे गात होतो, ते लोकांना आवडतच होते. गुरुजींच्या मागे गात असताना रसिक मला ऐकत होते. त्यामुळे मी माहित होतो सगळ्यांना. २० व्या वर्षी टी.वाय बी.कॉमला असताना मी पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवामध्ये सर्वप्रथम गायलो. २१ व्या वर्षी एचएमव्हीने माझा अल्बम काढला. कलेच्या क्षेत्रामध्ये कोणी जर गुणवान असेल तर त्याच्याकडे सर्वांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे ‘वर्ड ऑफ माऊथ’ने तुम्ही दूरवर पोहोचता. विसाव्या वर्षीच पंडित भीमसेन जोशी यांनी मला सवाई गंधर्व महोत्सवात गायला बोलावले आणि माझे अल्बम निघाले. तेवीस- चौविसाव्या वर्षी माझ्या लक्षात आले की, जाणकारांचे असं मत होतं की, मी आता स्वत:ची वेगळी वाट शोधायला हवी. मग माझ्यासाठी वेगळाच चॅलेंज निर्माण झाला. बेसिक चॅलेंज नव्हतेच मला. मी ईश्वरदत्त सुंदर गात होतो. त्याच्यावर गुरुजींचे सुंदर संस्कार झाले होते. त्यामुळे पुढे मी काहीही वेगळे केले नसते तरी जगाने माझे गाणे ऐकले असते. पण, ती माझी यशाची व्याख्या नव्हती. मला असे लक्षात आले की, माझ्या गाण्यामध्ये लोकांनी नॉस्टेल्जियात जात गुरुजींना शोधले, तर ते मला ऐकणारच नाहीत. गुरुजींना ऐकायला मिळावे म्हणून ते माझे गाणे ऐकायला येणार असतील तर त्याला म्हणतात नॉस्टेल्जियामध्ये राहणं. मला असे वाटले की, हे बरोबर नाही. हा नॉस्टेल्जिया लोकांच्या मनातून काढून टाकला पाहिजे. मी नॉस्टेल्जिया काढून टाकणार म्हणजे गुरुजींची आठवण होणार नाही का? ती होईल; पण आत्मिक रुपात होईल. त्यांचं गाणं ऐकायला मिळत नाही म्हणून किंवा त्यांचं गाणं परवडत नाही म्हणून माझं गाणं ऐकायला यायचं, असे होता कामा नये. म्हणजे मी माझ्या गुरुंची प्रतिकृती नाही आणि माझी स्वतंत्र जागा मी निर्माण करेन, असा चॅलेंज मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी घेतला. आणि तेथून मी बाहेर पडलो. मी हा दृष्टीकोन ठेवला, की वडिलांकडून आपल्याला दोन फ्लॅट मिळतात की नाही, ते घ्यायचे आणि त्यात स्वत:चे दोन फ्लॅट वाढवायचे. म्हणजे आपली संपत्ती चार फ्लॅटची करायची. पण, त्यासाठी आधी घर सोडावे लागते. नाहीतर आहे त्याच घरात माणूस राहतो, सुखासीन होतो आणि आयुष्यभर तिथेच राहतो. जर मला माझी गायकी मांडायची असेल तर माझ्या बंदिशी हव्यात. माझी पहिली बंदिश मी २५ व्या वर्षी बांधली. पण, माझ्यासाठी चॅलेंज हे होते की, मी सगळ्यांना माहिती असलेली अतिशय सर्वश्रृत अशी गायकी मांडत होतो. त्यात जर काही वेगळे द्यायचे असेल तर ते नितांत सुंदर झाल्याशिवाय तुम्ही नाही देऊ शकत. माझ्यामागे तुलना होती ती सर्वात श्रेष्ठ अशा प्रतिभावान माझ्या गुरुजींशी. ती आव्हानात्मक होती. त्याच्या बदली मी जी गायकी, बंदिश करेन ती त्याच्याएवढीच सुंदर व्हायला हवी होती. ती होत गेली आणि जगानेही स्वीकारली.
मी माझा कॉन्सर्ट repertoire बदलला. सगळा संजीव अभ्यंकर केंद्रीत केला. गुरुजींच्या नावाने ज्या लोकप्रिय रचना होत्या, त्या मी माझ्या मैफिलीत सादर करणे बंद केले. तिथे मी माझ्या रचना गाण्यास सुरवात केली. मेवाती घराण्याच्या बंदिशींमधे आपोआपच माझे कॉन्ट्रीब्युशन होत गेले. फक्तं कलेच्या जोरावर घर चालवायचं, इतक छोटं उद्दिष्ट, हे माझ कधीच नव्हतं. त्या ऐवजी मग मला इतर शैक्षणिक पर्याय उपलब्ध होतेच की. एवढी असुरक्षितता कशाला घेतली मग? ... मला कळत होतं हे सगळं. म्हणुनच मी नवनिर्मितीचा ध्यास घेतला.
गुरुजींनी जो मला contributory पाथ दाखवून दिला, त्यात मला जर, माझ्या सांगीतिक दृष्टीकोनातून गाणं मांडायचं असेल, तर माझ्या रचना पाहिजेत असं मला वाटलं . मग ते सुरु झालं. रचना बदलल्यावर मांडणी बदलते. मला जशी मांडणी हवी तशा रचना मी बांधल्या. माझ्या आवाजाचा सर्वोत्कृष्ठ वापर कुठे व कसा होऊ शकतो त्याला पूरक अशा रचना मी तयार केल्या. याला म्हणतात माझ्या पद्धतीने पीच बनविणे. पीचप्रमाणे मी माझी बॅटिंग नाही बदलली. मला हवं तसं पीच बनवलं. मग आपोआप माझी सांगीतिक दृष्टी बहरत गेली. मी अनेक कलावंतांना ऐकत होतो. पण, मी मुद्दाम कुणाचं उचललं नाही. माझी गायकी आपोआप बदलली गेली. ती मेवाती घराण्यात एक वेगळी गायकी म्हणून प्रस्थापित झाली आहे. धागा गुरुजींचाच; पण कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या गायकीचं. हा अगदी डिफिकल्ट पाथ होता. मी जे करायला गेलो, ते जर चांगलं झालं नसत तर रसिकांनी मला स्विकारल नसत. यशाच्या माझ्या व्याख्या फार वरच्या पातळीवरच्या होत्या. ही रिस्क मी चोवीस-पंचवीसव्या वर्षीच घेतली.
गुरुजींनी हवेली संगीताचा अभ्यास करून स्वतःसाठीचा Repertoire तयार केला जो ते मैफिलीमध्ये सादर करायचे. ते मराठी गायचे नाहीत. मी मराठी असल्यामुळे मी माझा अभंगाचा Repertoire तयार केला. माझा लहानपणापासूनचा मित्र
केदार पंडित हा अतिशय प्रसिद्ध संगीतकार. त्यांनी ३५० अल्बम केले आहेत. केदारने माझ्यासाठी खूप सुंदर रचना केल्या, बांधल्या. माझ्या गायकीला डोळ्यासमोर ठेवून रचना केल्या. जसे भीमसेन जोशी यांच्या गायकीला डोळ्यासमोर ठेऊन रामभाऊ फाटक, श्रीनिवास खळे यांनी रचना केल्या तसेच.
मी नॉस्टेल्जिक काहीच गायलो नाही. माझ्याच रचना किंवा माझ्या साठीच बांधलेल्या रचना गायल्या. माझ्या स्वत:च्या रचना, माझ्या वेबसाईट वर म्हणजे www.sanjeevabhyankar.com वर आणि माझ्या युट्यूब चैनल वर फ्री डाऊनलोड करायला ठेवलेल्या आहेत. त्याचा उद्देश एकच की, हे कॉन्ट्रीब्युटरी काम आहे आणि हे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावं. मी जे काही नवीन गाईन ते जर रसिक जनांनी प्रेमाने ऐकले तर तेच माझ्यासाठी यश होते. आणि आमच्या गुरुजींचेही हेच तत्व होते. त्यांच्या मनाला वाटेल तेच ते गायचे. उत्स्फुर्तता असे त्यात. कित्येक वेळा शेवटच्या क्षणी ते सगळं बदलायचे. ठरवलेले काहीच गायचे नाहीत. प्रचंड उत्स्फूर्त गाणं होतं त्यांचं. निसर्गतः माझेही तसेच आहे. असे अचानक उमटलेले गायन किती आनंद देऊन जाते....अनप्लॅन्ड. माझ्या तेव्हाच लक्षात आले की, सगळे मटेरियल कायम तयार पाहिजे.
मेवाती घराण्यात गुरुजींपासून जे रिव्होल्यूशन झाले, त्यात त्यांना मागच्या गायकीमध्ये खूप एलिमेंटस् ॲड करायला संधी होती. मला अशी संधी खूप नव्हती; कारण माझ्याकडे आलेली गायकी मुळातच खूप प्रगत होती. माझ्या गायकीमध्ये तोच विचार मला माझ्या प्रतिभेने मांडायचा होता, हे मला चॅलेंज होते. त्यावर एक एक पाऊल टाकत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करु शकलो. डिझाईन पूर्ण बदलले. इतके की, त्याच्यामध्ये कोणताच नॉस्टेल्जिया उरला नाही. माझ्या गुरुजींची ही गरज होती म्हणून त्यांनी ते केले आणि त्यामुळे मेवाती घराणे समृद्ध झाले. माझ्या आयुष्यातही ती गरज निर्माण झाली. माझ्या परिने मी मेवाती घराणे समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या पुढेही करत राहीन.

- मुलाखत व शब्दाकंन
सुजितकुमार पाटील