खासगी बसच्या वारेमाप भाडेवाढीस बसणार चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बसच्या वारेमाप भाडेवाढीस बसणार चाप
खासगी बसच्या वारेमाप भाडेवाढीस बसणार चाप

खासगी बसच्या वारेमाप भाडेवाढीस बसणार चाप

sakal_logo
By

खासगी बसच्या वारेमाप भाडेवाढीस चाप
व्हॉटस्अपद्वारे तक्रारीची सोय; प्रादेशिक परिवहनचा आदेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : दिवाळी अथवा उन्हाळी सुटीत प्रवाशांची गर्दी वाढते. याचा लाभ उठवत खासगी वाहतूकदारांकडून अनिर्बंध भाडेवाढ केली जाते. अशा भाडेवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने एसटी प्रवासी भाड्याच्या तुलनेत खासगी वाहतूकदारांनी मनमानी भाडे आकारू नये, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या प्रवाशांकडून नियमापेक्षा जास्त भाडे आकारले गेल्यास प्रवाशांना केवळ व्हॉटस्‌अपद्वारे किंवा मेलद्वारे प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करता येणार आहे. त्याची दखल घेतली जाईल. त्यामुळे सुटीच्या हंगामात नियमबाह्य भाडेवाढीला चाप बसण्याची शक्यता आहे.
येथील मध्यवर्ती बसस्थानक, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, इचलकरंजी भागांतून आराम बस चालवल्या जातात. त्यांची संख्या जवळपास साडेसहाशेवर आहे. यात बहुतांशी बस कोल्हापूर-मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, लातूर, नांदेड, पणजी (गोवा), बेंगलोर मार्गांवर प्रवासी वाहतूक करतात. पन्नास ते पंचावन्न आसनी गाड्यांना बारमाही प्रवासी असतो. शनिवारी, रविवारी तसेच सण, सुटीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढते. तेव्हा आराम गाडी मालक भाडे वाढवतात. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर नेहमीचे भाडे ८०० रुपये असल्यास हे भाडे १२०० ते दोन अडीच हजार रुपयांपर्यंत आकारले जाते. प्रवासीही अनेकदा वेळेत पोहचावे म्हणून भाडेवाढ देतात.
भाडे आकारणीतील फसवणूक टाळण्यासाठी जेवढे भाडे घेतले, त्याचे तिकीट काढून कोठून कोठे प्रवास केला, कोणत्या तारखेला प्रवास केला अशा तपशिलाचे तिकीट (पावती) पुराव्यासह प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केल्यास संबंधित आराम बसवर कारवाई होऊ शकते; मात्र अनेक प्रवासी तोंडी तक्रार करतात. जादा भाडे आकारल्याचे तिकीट देत नाहीत. तेव्हा कारवाई करण्याला अडथळे येतात.
याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील म्हणाले, ‘‘सुटीच्या कालावधीत जादा भाडे घेतल्याच्या तक्रारी प्रवासी सांगतात; मात्र पुराव्यानिशी तक्रार केल्यास कारवाई करता येईल. त्यासाठी यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत नियमापेक्षा जादा भाडे आकारणाऱ्या आराम बसबाबत विभागाच्या व्हॉटस्‌अप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. नियमबाह्य भाडे आकारलेल्या तिकिटाचा फोटो टाकून तक्रार करता येणार आहे. त्याची दखल घेऊनच संबंधित आराम बस मालकाची चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल.’’
-------------
चौकट
येथे करा तक्रार..
प्रवाशांना ८९९९८०३५९५ या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. एसटी महामंडळाचे सध्या भाडे विचारात घेऊन खासगी आराम बसधारकांनी त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा अधिक भाडेवाढ राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा आशयचा शासन आदेश आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.