प्रोत्साहनपर ५० हजार खात्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोत्साहनपर ५० हजार खात्यावर
प्रोत्साहनपर ५० हजार खात्यावर

प्रोत्साहनपर ५० हजार खात्यावर

sakal_logo
By

१३०० शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान जमा
१ लाख २९ हजार पात्र : दुसरी यादी काही दिवसांत होणार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील ३ लाख १९ हजार ८०३ शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात १ लाख २९ हजार २६० शेतकरी पात्र ठरले आहेत. महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकेत आधारकार्ड प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर एका मिनिटात संबंधित शेतकऱ्यांची पात्र रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यातील १३०० शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली. बॅंकांकडून मिळालेल्या यादीनुसार पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर झाली आहे. दुसरी यादी आठ ते दहा दिवसांत प्रसिद्ध होईल. यामध्ये आणखी किमान ४० ते ४५ हजार शेतकरी पात्र ठरू शकतील, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
जिल्हा उपनिबंधक शिंदे म्हणाले, ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून १ लाख २३ हजार ७०५ व राष्ट्रीयीकृत बॅंकांची ५ हजार ५५४ असे एकूण १ लाख २९ हजार २६२ शेतकऱ्यांच्या याद्या महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलवर प्रसिद्ध केल्या आहेत. ही यादी जिल्हा बॅंक तसेच राष्ट्रीयीकृत बॅंकेतही प्रसिद्ध केली जाणार आहे. सध्या पहिल्या यादीमध्ये ज्यांनी २०१७-२०१८, २०१८-१९ व २०१९-२०२० या तीन वर्षापैकी सलग दोन वर्ष प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली आहे. त्या शेतकऱ्यांना याचा लाभ दिला आहे. दुसऱ्या यादीत सुमारे ४० ते ४५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. दरम्यान, टाकळेवाडी (ता. शिरोळ) गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली रक्कम जमा झाली आहे.
........
या ठिकाणी मोफत होणार प्रमाणीकरण

आपले सरकार व महा ई-सेवेच्या १९८४ केंद्रांवर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ११० शाखा व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सर्व शाखांत जाऊन आपले आधारकार्ड प्रमाणिकरण करावे. हे सर्व प्रमाणिकरण मोफत करावे. प्रमाणिकरणाचे पैसे शासन देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
.....

ग्रामपंचायत, सेवा संस्थांमध्ये याद्या प्रसिद्ध होणार
जिल्ह्यातील जे शेतकरी प्रोत्साहनपर योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी संबंधित ग्रामपंचायत व सेवा संस्थांमध्येही प्रसिद्ध केली जाणार आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
....

पहिल्या यादीत तालुकानिहाय
पात्र ठरलेले शेतकरी

तालुका* पात्र शेतकरी
शिरोळ*१४ हजार ७१५
शाहूवाडी*३ हजार ८३८
राधानगरी*११ हजार ७०६
पन्हाळा*११ हजार ५२९
कोल्हापूर* १२१
करवीर*२० हजार ६७८
कागल*१२ हजार ८४७
हातकणंगले*१२ हजार ८६
गडहिंग्लज* ९ हजार ५९४
चंदगड*१२ हजार ८५२
भुदरगड* ८ हजार ९०७
गगनबावडा* २ हजार २७०
आजरा* ८ हजार ११७
एकूण* १ लाख २९ हजार २६०