Rain Update : ७८ गावातील ९८९ हेक्‍टर पीक बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop damage
७८ गावातील ९८९ हेक्‍टर पीक बाधित

Rain Update : ७८ गावातील ९८९ हेक्‍टर पीक बाधित

कोल्हापूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा आज सकाळी सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तर, १ ऑक्‍टोबरपासून आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ७८ गावांमधील ९८९ हेक्‍टर क्षेत्रावरील भात, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, नाचणी या पिकांना फटका बसला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीत हा आकडा समोर आला आहे. दरम्यान, आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी आणि शेतीला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ८ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून ५०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात काही दिवसापासून ढगफुटीसदृश पावासाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतातील धान्य आणि कडधान्य पिकांची दैना उडाली आहे. हातातोंडाला आलेली पिके मातीमोल होत आहेत. काल झालेल्या मुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आज सकाळपासून पावसाने उघडीप देवून दिलासा दिला आहे. शेतातील पिके वाळण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे. आकाशात असेच ढग राहिले तर मात्र पिकांची काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. जिल्ह्यात १ ऑक्‍टोबर ते कालपर्यंत झालेल्या पावसामध्ये ९८९ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ६७३.८० हेक्‍टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. तर, १९३ हेक्‍टरवरील भुईमूग, भाजीपाला ६८.२० हेक्‍टर, भाताच्या ५४.३० हेक्‍टरवरील क्षेत्राला फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्‍यातील ६२ गावांमधील ९३३ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. करवीर तालुक्‍यातील ५ गावांमधील २.६० हेक्‍टर, पन्हाळ्यातील ४ गावांमधील ४९ हेक्‍टर गावातील पिके बाधित झाली आहेत.

जिल्ह्यातील पिके बाधित झालेली गावे
तालुका - एकूण बाधित गावे
करवीर ५
पन्हाळा ४
हातकणंगले ६२
भुदरगड ७
एकूण ७८

हे बंधारे पाण्याखाली
राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व दत्तवाड.