प्रामाणिकपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रामाणिकपणा
प्रामाणिकपणा

प्रामाणिकपणा

sakal_logo
By

फोटो- 56289
...........
दहा तोळे दागिने प्रामाणिकपणे परत
निवृत्त शिक्षकाला मिळाला दिलासा; विशाल मोरेंसह परीट कुटुंबीयांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः सोने तारण कर्ज काढण्यासाठी जात असलेल्या निवृत्त शिक्षकाचे दहा तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग रस्त्यावर पडली. तशी त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने दागिन्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र त्याला यश येत नव्हते. काय होणार, कसं होणार या चिंतेत असताना त्यांना विशाल तानाजी मोरे (वय ३२, रा. जीवबा नाना पार्क) यांचा फोन आला. त्यांनी चिंता करू नका दागिने माझ्याकडे आहेत. ते तुम्हाला परत देतो असे सांगितले. त्या तरुणाचे हे शब्द कानावर पडताच आणि आजच्या काळातील त्यांचा प्रामाणिकपणा पाहून शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहिले. प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणाऱ्या मोरेंचा करवीर पोलिसांनी सत्कार केला.

नवीन वाशीनाका येथे तानाजी भिवाजी देसाई (वय ६२) हे कुटुंबासह राहतात. ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आज सकाळी ते सोने तारण कर्ज काढण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांनी लाल रंगाच्या बॅगेत सोन्याचे ब्रेसलेट, लक्ष्मीहार, दोन हार असे दहा तोळयाचे दागिने ठेवले होते. त्यांनी ही पिशवी मोटारसायकलच्या डिक्कीतील रेनकोटवरच ठेवली. त्यामुळे डिक्की पूर्णपणे बंद न झाल्याने दागिन्यांची ही पिशवी हादऱ्याने रस्त्यावर पडली. हे त्यांच्या बँकेत गेल्यावर लक्षात आले. तसा त्यांना धक्का बसला. त्यांनी थेट करवीर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार ठाणे अमलदार सुनील देसाई यांना सांगितला. त्यांनी तातडीने अमंलदार राजू बेनवार आणि चालक सुनील देसाई यांना शिक्षकांसोबत जाऊन दागिन्यांचा शोध घेण्यास सांगितले. पोलिसांनी शिक्षकांना धीर देत दागिन्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, जीवबा नाना पार्क येथे राहणारे मोरे सकाळी सासरे नामदेव परीट यांच्यासोबत घरी जात होते. त्यांना रस्त्यात पडलेली पिशवी सापडली. त्यामध्ये दोन स्टँम्प, चेक बुक आणि दागिने असल्याचे लक्षात आले. मोरे यांनी धनादेशावरील मोबाईल क्रमांकावरून संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण हतबल झालेल्या देसाईंकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तोपर्यंत मोरे यांनी याची माहिती पत्नी हर्षदा आणि सासू नंदा परीट यांना दिली. त्यांनीही दागिने मालकाच्या शोधासाठी व्हिडिओ तयार केला. काही वेळानंतर मोरे यांनी केलेल्या फोनला देसाई यांनी प्रतिसाद दिला आणि करवीर पोलिस ठाण्यात सायंकाळी दागिने प्रामाणिकपणे परत केले. मोरे यांचे पोलिस उपनिरीक्षक सूरज बनसोडे, उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण,अंलदार फिरोज मुल्ला, दत्तात्रय बांगर, सुनील देसाई आदींनी त्यांचे कौतुक केले.
------------
दुसऱ्याच्या आनंदात आनंद...
दहा तोळे सोन्याची किंमत साधारपणे पाच लाख रुपये होते. मात्र, मोरे व परीट कुटुंबीयांनी सापडलेले दागिने पुन्हा परत देण्यासाठी केलेली धडपड कौतुकास्पद ठरली आहे. ज्याचे कुणाचे दागिने गहाळ झाले असतील त्याची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनाच त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर देसाई यांना दागिने परत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांची ही अस्वस्थता दूर झाली.