१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

‘ती’ सांस्कृतिक ठेव भविष्यात तग धरेल का?
नुकतीच एक बातमी वाचनात आली, की ग्रामीण भागातील एका शिबिरात ३०० महिलांनी सुंदर कलात्मक गोधड्या हातांनी शिवून तयार केल्या. आता थंडीला सुरुवात झाल्याने तिचा सामना करण्यासाठी स्वेटर, मफलर, रग, जाड चादर आदींची जमवाजमव सुरू झाली. आमच्या गल्लीत एक ग्रामीण महिला ‘गोधडी शिवायची हाय काय?’ म्हणून ओरडत जाताना दिसली. नव्या जमान्यात (कोल्हापूर तसं ग्रामीण बाज असलेलं शहर आहे. पुण्या-मुंबईची हवा अद्याप येथे लागलेली नाही) कोणी अशी गोधडी शिवून घेईल का, असा प्रश्‍न पडतो. अशा वेळी मला जुना काळ आठवला. आईच्या मायेच्या उबदार गोधडीत सारी भावंडे एकत्र झोपलेले दृश्‍य नजरेसमोर आले. पूर्वी आई, आजी व पणजींनी शिवलेल्या गोधड्या घरी असायच्या. त्यात त्यांचे प्रेम व मायेची ऊब असायची. जुन्या साड्या व जुने कपडे वापरून गोधड्या शिवल्या जायच्या. पूर्वी गोधडीचा वापर सर्वत्र व्हायचा. आता जमाना बदलला. फ्लॅट व बंगला संस्कृती आली. उबदार गाद्या आल्या, किमती पांघरुणे आली. गोधडीचा जमाना संपत आला. त्यामुळे मायेची ऊबही आता कमी होत आहे. खरंच, ‘ती’ सांस्कृतिक ठेव भविष्यात तग धरेल का?
अरुण कोटगी-बेनाडीकर, कोल्हापूर

जंगलांच्या आगी आटोक्यात आणाव्यात
जंगलांना आग लागणे ही सजीवांसाठी चिंतेची बाब आहे. कारण, जंगलावर पाऊसमान आणि पावसावर सर्व काही अवलंबून असते. या आगी नैसर्गिक आहेत की कृत्रिम, याचा अभ्यास करायला हवा. नैसर्गिक आग असेल तर ठीक आहे. जर ती मानवनिर्मित असेल तर अशा लोकांना कठोर शासन झाले पाहिजे. कारण, जंगलात अनेक प्रकारचे प्राणी असतात, ते मृत्युमुखी पडतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या औषधी वनस्पती नष्ट होतात. त्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते. अशा आगी जंगलांना लागल्या तर त्या कशा प्रकारे आटोक्यात आणता येतील, याचा सर्वंकष कृती आराखडा तयार करायला हवा. त्यावर अनुमान काढून निरीक्षण केले पाहिजे. त्याचबरोबर इतर देशांची मदत घेता येईल का, याचा विचार करून जलद गतीने योग्य ती कृती करायला हवी. जंगलातील वन्यजीवन सुरळीत चालले पाहिजे. त्याचा निसर्गावर व मानवावर परिणाम होतो. अशा आगी कुठेही लागल्या तर त्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात. त्यात जंगलगस्त पथक जागोजागी नेमले पाहिजे. त्यांना सर्व सोयी व प्रशिक्षणही दिले पाहिजे. आकाशातून जंगलावर नजर ठेवायला हवी. आग लागली तर कृत्रिम पाऊस पाडता येईल का, याचा विचार करून कृती केली पाहिजे. कुठे आग लागली तर ती लगेच आटोक्यात आणायला हवी. त्यासाठी ठराविक अंतरावर गस्तीपथके नेमली पाहिजेत. त्यांचा योग्य तो संपर्क सर्वत्र राहायला हवा. जेणे करून लगेच कृती करता येईल. जास्त नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
सुदर्शन झलगे, कुंभोज (जि. कोल्हापूर)