मंदिरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिरात चोरी
मंदिरात चोरी

मंदिरात चोरी

sakal_logo
By

सायबर चौक परिसरातील
मंदिरात चोरी
कोल्हापूर, ता. १५ ः सायबर चौक परिसरातील मरगूबाई देवीच्या मंदिरातून चोरट्याने सोन्याचा मणी, समई, घंटी, कळशी, ताटे, पणत्या असा १७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
---------

56553

अंबाबाई मंदिरात चोरी
करणाऱ्या दोघा महिलांवर गुन्हा
सीसी टीव्हीच्या आधारे कारवाई; १२ हजारांची रोकड जप्त
कोल्हापूर, ता. १५ ः अंबाबाई मंदिरात गर्दीचा फायदा घेऊन भाविक महिलेची रोकड असलेली पर्स लांबविणाऱ्या दोघा महिलांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. गीता शिवाप्पा कुरबुरू (रा. दावणगिरी, कर्नाटक) आणि कमल कृष्णात गायकवाड (पुणे) अशी या संशयित महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाबाई मंदिरात गांधीनगर येथील एक महिला सकाळी दर्शनासाठी गेली होती. त्यांनी खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये १२ हजारांची रोकड असलेली छोटी पर्स ठेवली होती. या वेळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती. मुखदर्शन रांगेमध्ये दर्शन घेत असताना दोघा संशयित महिलांनी रोकड असलेली पर्स हातोहात लांबवली. मंदिरातील सीसी टीव्हीत हा प्रकार कैद झाला. त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने त्या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोकड जप्त करून गुन्हा दाखल केला. मंदिरातील सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या दहा मिनिटात हा प्रकार उघडकीस आला. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, राजेंद्र कांबळे, महिला पोलिस सहायक फौजदार नंदिनी मोहिते, देवानंद बल्लारी, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभागप्रमुख राहुल जगताप, अवधूत चौगुले, अनिकेत बागल, रोहित आवळे आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
-------------

जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा

पाडळी खूनप्रकरण : अंनिसची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

कोल्हापूर, ता. १५ ः पाडळी (ता. करवीर) येथे काही दिवसापूर्वी उत्तरेश्वर पेठेतील एका महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यानुसारही गुन्हा नोंद करावा, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंबधी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेतली असल्याचे पत्रक अनिल चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार संबंधित महिलेच्या घरामध्ये खोल खड्डा काढण्यात आलेला आहे. अशी परिस्थितीजन्य व वस्तुस्थिती दिसत असतानाही पोलिस ठाण्यात केवळ खुनाचाच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना भेटून अर्ज दिला आहे. पण करवीर पोलिसांनी मंत्रतंत्राचे धार्मिक विधी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाले असल्याचे कारण सांगितले. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांशी कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. पण अद्याप पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद झालेला नाही. याबाबत कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. शिष्टमंडळात पुणे येथील राज्य कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव, अनिल चव्हाण, गीता हासूरकर, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, संजय सुळगावे, रेखा दीक्षित, राजू सूळ, आकांक्षा दळवी आदींचा समावेश होता.