डॉ. प्रभाकर कोरे हेच विद्यापीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. प्रभाकर कोरे हेच विद्यापीठ
डॉ. प्रभाकर कोरे हेच विद्यापीठ

डॉ. प्रभाकर कोरे हेच विद्यापीठ

sakal_logo
By

KOP22L56587
बेळगाव ः येथे शनिवारी डॉ. प्रभाकर कोरे यांचा सपत्नीक सत्कार करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत. शेजारी बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राधाकृष्ण विखे-पाटील आदी.

डॉ. प्रभाकर कोरे हेच एक विद्यापीठ
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान ः अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त गौरव
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १५ : केएलई संस्थेची धुरा सांभाळल्यापासून संस्थेचा विस्तार कर्नाटक, महाराष्ट्र आणि देशभरात करणारे डॉ. प्रभाकर कोरे हेच एक विद्यापीठ आहे. त्यांच्या कार्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज येथे केले.
केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडांगणावर आयोजित सोहळ्यात श्री. प्रधान बोलत होते. यावेळी श्री. प्रधान म्हणाले, ‘डॉ. कोरे यांचे कार्य फक्त शिक्षण, राजकीय, सामाजिक, उद्योग या पुरते मर्यादित नसून संत बसवेश्वर यांनी हजार वर्षांपूर्वी हाती घेतलेले समाज सुधारणेचे काम पुढे घेऊन ते जात आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे येणाऱ्या काळात अनेक बदल घडणार आहेत; मात्र केएलई संस्थेने अगोदरच अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. येणाऱ्या काळातदेखील डॉ. कोरे यांनी अशाच प्रकारे कार्य सुरू ठेवावे. त्यांच्या कार्याला अशीच साथ राहू देत.’
केएलई संस्था विश्‍वमान्य करण्यात डॉ. कोरे यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, ‘त्यांनी शिक्षण संस्थांचा विस्तार केला. अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावर मात करीत संस्थेची प्रगती केली. संस्थेच्या कामासाठी अधिक वेळ दिला नसता तर ते एक मोठे राजकीय नेते झाले असते; मात्र विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले. नवीन तंत्रज्ञान आपल्या शिक्षण संस्थामध्ये यावे, यासाठी डॉ. कोरे सतत आग्रही राहिले.’
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘केएलई संस्थेतून गोव्यातील अनेक विद्यार्थांनी शिक्षण घेतले असून केएलई संस्थेने बेळगावचे नाव मोठे केले. गोवा आणि बेळगावचे जवळचे संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव भारत निर्माण करण्याचे कार्य पुढे घेऊन जाण्यात केएलई आणि डॉ. कोरे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.’ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे, हा योगायोग आहे. केएलई संस्था वाढवत असतानाच त्यांनी वेगवेगळ्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी नेहमीच प्रयत्न केले. हुबळीसह इतर ठिकाणी रुग्णालये उभारली जात असून केएलई संस्थेच्या माध्यमातून लाखो रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे.’
महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी श्री. प्रधान यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले व कोरे दाम्पत्याचा श्री. प्रधान यांच्यासह अन्य उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. कोरे यांची ग्रंथतुलाही करण्यात आली.
केएलईचे अध्यक्ष बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी स्वागत केले. माजी विधान परिषद सदस्य महांतेश कलघटगी यांनी प्रास्तविक केले. पालक मंत्री गोविंद कारजोळ, गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव, खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले, शिक्षण मंत्री बी. सी. नागेश, उद्योग मंत्री मुरगेश निरानी, समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, राज्यसभा खासदार ईरान्ना कडादी, लक्ष्मण सवदी, बसवराज होरट्टी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, आमदार प्रकाश आवाडे, श्रीमंत पाटील, जिल्हाधिकारी नीतेश पाटील आदी उपस्थित होते.

शरद पवार यांचे नेहमीच सहकार्य
डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, ‘माझ्या जीवनातील आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, राजकारणात जास्त दिवस असतो तर मंत्री नक्कीच झालो असतो; मात्र समाजाला चांगली आरोग्य सुविधा मिळावी, शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. केएलई रुग्णालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून जागतिक दर्जाच्या सुविधा केएलई रुग्णालयात मिळत आहेत. येणाऱ्या काळात अनेक ठिकाणी रुग्णालये सुरू केली. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी नेहमीच साथ दिली. पक्षीय राजकरण कधीही संस्थेच्या आड आले नाही. त्यामुळे संस्थेची वाटचाल होण्यास मदत झाली. अनेक नेत्यांनी केएलईमधून शिक्षण घेतले. येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.’