दिवाळी खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी खरेदी
दिवाळी खरेदी

दिवाळी खरेदी

sakal_logo
By

56582
कोल्हापूर : दिवाळी आता आठवड्यावर आली असून खरेदीला उधाण आले असून महाव्दार रोडवर सहकुटुंब खरेदीसाठी गर्दी होवू लागली आहे. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)

खरेदीसाठी सळसळता उत्साह
विविध ऑफर्सचा खजीना; पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत गर्दी वाढू लागली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : दिवाळीचा सण आता केवळ आठ दिवसावर आला असून खरेदीला उधाण आले आहे. गेली काही दिवस दुपारनंतर होणाऱ्या पावसाने आजपासून पूर्णपणे उघडीप दिल्याने महाव्दार रोडसह शहरातील प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. दरम्यान, उद्या (रविवार) सणापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सहकुटुंब खरेदीला उधाण येणार आहे. विविध शोरूम्सनी दिवाळी खरेदीसाठी ऑफर्सचा खजीना खुला केला असून खरेदीबरोबरच आता वाहनांच्या बुकींगलाही प्रारंभ झाला आहे.
गेली काही दिवस बाजारपेठ दिवाळीसाठी सजली असली तरी चार-पाच दिवसाच्या पावसाने खरेदीच्या उत्साहावर पाणी फिरले. विक्रेत्यांची तर खूप मोठी तारांबळ झाली. आज दुपारी काही काळाचा अपवाद वगळता पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. शनिवार आणि महाव्दार रोडवरची खरेदी हे एक समीकरणच असल्याने सायंकाळनंतर महाव्दार रोड खरेदीसाठी गर्दीने फुलून गेला.
------------
चौकट
फराळाबरोबरच गिफ्ट आर्टिकल्सही
तयार फराळाबरोबरच यंदा गिफ्ट आर्टिकल्सचाही मोठा ट्रेंड आहे. त्याचे मार्केटींग विविध माध्यमातून सुरू झाले असून सोशल मीडियाचा त्यासाठी प्रभावी वापर केला जावू लागला आहे. तयार फराळासह फराळासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदीही आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात गारमेंट व फटाक्यांसह पणत्या, रांगोळी, आकाशकंदिल आदी खरेदीची झुंबड उडणार आहे.
-----------------
सर्वच क्षेत्रात उत्साहाचे वातावरण
इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेसह रिअल इस्टेट, सराफ कट्ट्यावर दसऱ्यापासून उत्साहाचे वातावरण असून दिवाळीसाठीही या क्षेत्रांनी अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मोबाईलसह एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंची मोठी रेंज इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत उपलब्ध असून ऑटोमोबाईल क्षेत्रातही बुकींगला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दिवाळीलाही ई-बाईक्सचा ट्रेंड राहण्याची शक्यता आहे. अर्थसहाय्यासाठी विविध वित्तीय योजनाही बाजारपेठेत उपलब्ध असून रिअल इस्टेट क्षेत्रातही तेजीचे वातावरण आहे. स्वप्नातील घर खरेदीसाठी अनेक नवे प्रकल्प शहर आणि परिसरात साकारत असून विविध बॅकांनी त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. दिवाळी पाडव्याच्या खरेदीची धूमही आत्तापासूनच सराफ कट्ट्यावर जाणवू लागली आहे.
------------------
ऑफलाईन खरेदी करा...
ऑनलाईन खरेदीपेक्षा यंदा ऑफलाईन खरेदी करून विविध विक्रेत्यांना पाठबळ देण्याचे आवाहन विविध माध्यमातून सुरू झाले आहे. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. महाव्दार रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आदी भागात विक्रेत्यांचे स्टॉल सज्ज असून पावसाच्या संकटावर मात करत येथील विक्रेते मंडळी पुन्हा नव्या दमाने कामाला लागली आहेत.