Kolhapur ‘पंचगंगे’च्या पात्रात कचऱ्याचा ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchganga
पंचगंगेत कचरा

Kolhapur : ‘पंचगंगे’च्या पात्रात कचऱ्याचा ढीग

कसबा बावडा : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीबरोबरच ‘जयंती’सह अन्य नालेही ओसंडून वाहत आहेत. अशा नाल्यांतून आलेला कचऱ्याचा मोठा ढीग पंचगंगा नदीत राजाराम बंधाऱ्याजवळ अडकून पडला आहे.

बंधाऱ्याच्या दरवाजातून हा कचरा जात नाही आणि पाणी उतरल्याने प्रवाहासमवेतही जात नसल्याने तिथेच अडकून पडला आहे.

जिल्ह्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आठ दिवसांत पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा फटका काढणीला आलेल्या भात व सोयाबीन पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या पावसामुळे दोन दिवसांपूर्वी पाण्याखाली गेलेला राजाराम बंधारा खुला झाला होता.

मात्र, शुक्रवारच्या पावसामुळे पुन्हा बंधाऱ्यावर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. अजूनही बंधाऱ्यावर पाणी असून, बंधाऱ्याच्या मध्यभागीच नदीतून वाहून आलेल्या कचऱ्याचा ढीग अडकून पडला आहे. यात प्लास्टिकच्या पिशव्या, रिकामा बाटल्या, तुटलेल्या झाडांच्या फांद्यांचा समावेश आहे. हा कचरा न हटवल्यास त्याचा बंधाऱ्यालाही धोका पोहोचण्याची भीती आहे.