भटक्या गायींचे मालक प्रकटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या गायींचे मालक प्रकटले
भटक्या गायींचे मालक प्रकटले

भटक्या गायींचे मालक प्रकटले

sakal_logo
By

भटक्या गायींचे मालक प्रकटले
नागरिकांतून संताप; जनावरे महापालिकेने ताब्यात घेण्याची मागणी
इचलकरंजी, ता. १६ : मोकाट गायींच्या मालकांना आपल्या जनावरांची आठवण येताना दिसत आहे. शहरातील फिरणाऱ्या भटक्या गायींमध्ये लम्पीचे संक्रमण वाढत असताना अनेक मालकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. यावेळी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी व सामाजिक संस्था, गोपालक, विविध सेवाभावी संघटना मदतीला धावल्या होत्या. योग्य उपचाराने भटक्या गायी लम्पीमुक्त झाल्यावर त्याचे छुपे मालक बाहेर येताना दिसत आहेत. त्यामुळे मुक्या जनावरांना आवश्यकता असताना लपलेले मालक आता समोर येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या गायी महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
इचलकरंजी शहरात सुमारे २५० हून अधिक गायी रस्त्यावरून फिरत आहेत. या सर्व गायी भटक्या नसून बहुतांश गायींचे मालक आहेत; मात्र ते केवळ त्यांच्यापासून मिळणाऱ्या लाभासाठी येत असतात. इतर वेळी गायींना अन्नाचा शोध घेण्यासाठी पावसात, उन्हात, थंडीत सोडून देण्यात येते. यावरून मालकांना गायींना होणाऱ्या इजा, दुखापती याचे काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसते. शहरात लम्पीचा प्रसार झाल्यानंतर तर या मालकांच्या निर्दयीपणावर शिक्कामोर्तब झाले. लम्पी भटक्या गायींमध्ये होताना महापालिका प्रशासनाने गायी घेऊन जावे, असे प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले होते; मात्र लम्पीमधून या गायी बचावणार नाहीत, असा समज करून कोणीही पुढे आले नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन, पशुवैद्यकीय अधिकारी व सामाजिक, सेवाभावी संस्था यांनी लसीकरण व उपचार करण्यास सुरुवात केली होती. उपचाराला प्रतिसाद देत अनेक भटक्या गायी लम्पीमुक्त झाल्या. सध्या लम्पीचा प्रसार कमी होत असल्याने व भटकण्यास सोडलेली जनावारे जीवित असल्याने भटके मालक पुन्हा प्रकट होत आहेत.
---------
भटक्या गायींपासून कधी सुटकारा मिळणार
शहरातील भटक्या गायींच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०२१ मध्ये एका संस्थेस २० गुंठे जागा दिली आहे; मात्र वर्षाचा कालावधी होत असतानाही भटक्या गायींबाबत ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. लम्पीमध्ये गायी भटकत आल्याने उपचार करण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. महापालिका प्रशासनाने संबंधित जागेची माहिती घेऊन भटक्या गायींचा बंदोबस्त करणे आवश्यक बनले आहे.
-------
शहरात फिरणाऱ्या भटक्या गायींमध्ये लम्पीसदृश लक्षणे दिसल्यास त्यांना राजीव गांधी भवन येथे आणून उपचार करीत आहोत. सध्या सुमारे ४० गायींवर उपचार सुरू आहेत; मात्र ज्या गायी लम्पीमुक्त होत आहेत. त्यांचे मालक येऊन गायी परत नेण्याची मागणी करीत आहेत, मात्र याबाबत महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
-रवी जावळे, माणुसकी फौंडेशन