दिवाळी खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी खरेदीसाठी गर्दी
दिवाळी खरेदीसाठी गर्दी

दिवाळी खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By

56798
...........
महाव्दार रोड हाउसफुल्ल

दिवाळी खरेदीची धांदल ः राजारामपुरीसह बाजारपेठांत प्रचंड गर्दी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः अवघ्या आठवडाभरावर आलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी रविवारी बाजारपेठेत खरेदीची धांदल उडाली. महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड या परिसरात आकाशकंदील, रांगोळी, पणत्या, रोषणाई, सजावटीच्या वस्तू व फराळाच्या साहित्यापासून कपड्यांच्या खरेदीसाठी रविवारी सुटी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले. महाव्दार रोडवर सकाळपासूनच झालेल्या गर्दीमुळे गेल्या दोन वर्षांतील कोरोनामुळे आलेली मरगळ बाजारपेठेने झटकल्याचे दिसत होते.
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीप्रमाणे घराघरांत उत्साहाचे वातावरण असते. पुढील सोमवारपासून (ता. २४) दिवाळीला प्रारंभ होणार आहे. तयारीसाठी केवळ आठवडाच शिल्लक राहिल्याने सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.
शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, लक्ष्मी रोड, महाद्वार रोड, गांधीनगर येथील बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. शहरातील मॉल, बझारमध्येही गर्दी आहे. दिवाळीच्या वैविध्यपूर्ण पणत्या, विद्युत माळा, मेणबत्यांचे स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले आहेत. ब्रँडेड कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील दसरामधील ऑफर्स कायम आहेत. ऑफर्सची जाहिरातबाजी करून ग्राहकांना खेचण्यासाठी प्रचंड स्पर्धा दिसत आहे. शहराच्या चौकाचौकांत फलकांद्वारे आकर्षक जाहिरात केल्या जात आहेत. शिवाय मोबाइलवरही एसएमएसने ऑफर्सची माहिती दिली जात आहे.

रविवारी सुटीचा दिवस असल्याने महाद्वार रोडवर सकाळपासून खरेदीसाठी गर्दी होती. सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने येथे दिवसभर गर्दी होती. सायंकाळनंतर तर त्यामध्ये आणखीच वाढ झाली. सध्या लक्ष्मीपुरीतील बाजारपेठेत फराळाच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी आहे. लक्ष्मी रोडवर, तसेच राजारामपुरीत असलेल्या कपड्यांच्या दुकानांनी विविध योजना जाहीर केल्या असल्याने ही दुकाने दिवाळीसाठी नटल्याचे दिसत होते. या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असल्याने काहींनी दुकानाबाहेरही स्टॉल लावले आहेत.
---------------
किरकोळ दुकानदारांकडून लकी ड्रॉ
फराळासाठी लागणारे साहित्य म्हणजेच तेल, रवा, पिट्टी, खोबरे, डाळी, डालडा अशा किराणा मालाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनकडून दिवाळी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या दुकानांत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या कूपनचे वाटप केले जात असून, ई स्कूटर, वॉशिंग मशिन्स, आटा चक्की, टीव्ही, पैठणी आणि इतर भेटवस्तूंची लयलूट यानिमित्ताने केली जाणार आहे. ऑनलाईन शॉपिंग न करता स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा, असे आवाहन केल्यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना किरकोळ दुकानदार असोसिएशनने आणली आहे.