माल वाहतुकदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माल वाहतुकदार
माल वाहतुकदार

माल वाहतुकदार

sakal_logo
By

माल वाहतूकदार भाडेवाढीच्या उंबरठ्यावर

लवकरच मेळावा : जिल्ह्यात १६ हजारांवर माल वाहतूकदार

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १६ ः गेल्या दोन वर्षांत सतत झालेल्या इंधन व टोल दरवाढीमुळे माल वाहतूकदार मेटाकुटीला आले आहेत. अन्य राज्यांत मालवाहतुकीची भाडेवाढ झाली. या पाठोपाठ राज्यभरातही माल वाहतूकदार भाडे वाढवण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पुढील आठवड्यात माल वाहतूकदारांचा मेळावा होणार आहे. त्यामध्ये किमान ३० ते ५० टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहमतीने भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचा लाभ जिल्हाभरातील १६ हजारांवर माल वाहतूकदारांना होणार आहे.
जिल्ह्यातून परराज्यात माल वाहतूक करणारे ८ हजारांवर ट्रक आहेत. तेवढेच ट्रक जिल्ह्यांर्तंगत किंवा विभागाअंतर्गंत (तीन ते चार जिल्ह्यांत) माल वाहतूक करतात. यात औद्योगिक माल, शेतीमाल, व्यापारी माल, अन्य घरगुती वस्तू अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूक होते.
गेल्या तीन वर्षांत डिझेलचे दर ६५ रुपयांवरून १०७ रुपयांपर्यंत वाढले. काही प्रमाणात कमी झाले. सध्या ९५ रुपये एक लिटर डिझेल मिळते. यात महामार्ग व राज्यमार्गावर टोल नाके आहे. तेथील टोल २५ टक्के वाढला आहे. त्यामुळे माल वाहतूकदारांना प्रती एक किलोमीटरसाठी ८ रुपये टोल द्यावा लागतो.
याशिवाय ट्रकचालकांचे वेतन १५ हजार रुपये, क्लिनर वेतन दहा हजार रुपये. भत्ते रोजचे प्रत्येकी पाचशे रुपये. गाडीचा घसारा (टायर झीज चार रुपये प्रती किमी )असा वाहतूकदारांचा एकूण खर्च वाढला आहे. यातून मिळणाऱ्या भाड्यात तीन ते पाच टक्के नफा शिल्लक राहतो. यातून गाडीचा हप्ता भागवणेही मुश्कील होते. या सर्व पार्श्वभूमीवर राजस्थान, बिहार, कर्नाटक राज्यांतील माल वाहतूकदारांनी माल वाहतुकीच्या भाड्यात गेल्या वर्षी ३० टक्के वाढ केली. त्यामुळे मालवाहतूकदार संघटना राज्य समितीशी चर्चा करून पुढील आठवड्यात भाडेवाढीचा निर्णय घेणार आहे.
...................
कोट

‘‘गेल्या तीन वर्षांत या भाड्यात वाढ झाली नाही, मात्र माल वाहतूकदारांचे अन्य खर्च वाढले. अशात कोरोनाकाळात माल वाहतूकदारांना मोठा फटका बसला. अनेकांच्या कर्जाचे हप्ते थकलेत. तर जे घटक सध्या व्यवसाय करतात त्यांना खर्च पेलवत नाही. काही वेळा काम मिळत नसल्याने गाडी थांबून राहते, खर्च सुरू राहतो. अशा स्थितीत नुकसान टाळण्यासाठी माल वाहतुकीच्या भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.’’

सुभाष जाधव, जिल्हा लॉरी आपरेटर असोसिएशन.