वैभव आत्महत्या बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभव आत्महत्या बातमी
वैभव आत्महत्या बातमी

वैभव आत्महत्या बातमी

sakal_logo
By

३३०१

मॅरेथॉनच्या नावाखाली फसवणूक
करणाऱ्या संशयिताची आत्महत्या
शेतात घेतला गळफास; आठ लाखांच्या फसवणुकीचा आरोप.
सकाळ वृत्तसेवा
तिरपण/कोल्हापूर, ता. १६ ः मॅरेथॉन स्पर्धकांची आर्थिक फसवणूक करणारा संशयित वैभव भैरू पाटील (वय २४, रा. तिरपण, ता. पन्हाळा) याने आज शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. फसवणूकप्रकरणी त्याची पत्नी पूनमवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभवच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. वैभववर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करतो असे सांगून सुमारे ८ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास शाहूपुरी पोलिस करीत आहेत.
वैभव याने ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देऊन सुरक्षा कर्मचारी म्हणून नोकरी देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी त्याने मराठा कमांडो सिक्युरिटी इंटलिजेन्स मॅन पॉवर्स फोर्स ही कंपनी सुरू केली होती. त्यातून त्याने काही तरुणांना सुरक्षा कर्मचारी म्हणून नोकरीला लावले. त्याचे शाहूवाडी तालुक्यात कार्यालयही होते. मात्र, तेथे काही जणांबरोबर वाद झाल्याने त्याने आपले कार्यालय शाहूपुरी येथील बेकर गल्लीमध्ये सुरू केले. त्याने कमांडो हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा तपोवन मैदानावर रविवारी (ता. १६) होणार होती. या स्पर्धेत त्याने विविध गटांत सुमारे ३० लाख रुपयांची बक्षिसे देण्याचे जाहीर केले होते. सोशल मीडियावरून स्पर्धेची जाहिरात केल्याने देशभरातील ९०० स्पर्धकांनी नोंदणी केली होती. शनिवारी (ता. १५) स्पर्धेचे किट घेण्यासाठी राजारामपुरीतील एका सभागृहाबाहेर स्पर्धक आले. त्यावेळी वैभवचा फोन स्विच ऑफ येत होता. स्पर्धकांना संशय आल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार केली. रात्री उशिरा वैभव आणि त्याची पत्नी पूनम या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वैभवचा शोध सुरू केला. मात्र, तो सापडला नाही. त्याच्या पत्नीची चौकशी करून वैभवचे मोबाईल लोकेशन तपासले. त्यानंतर रात्री पोलिस तिरपणला त्याचा घरी गेले; पण तो घरी आढळून आला नाही.
रविवारी सकाळी ९ वाजता तिरपणमधील चेटन नावाच्या शेतात आंब्याच्या झाडाला वैभवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे ऊस तोडणी कामगारांना दिसून आले. वैभवचे चुलते जोतिराम बापू पाटील यांनी पन्हाळा पोलिसांत वर्दी दिली. घटनास्थळी पन्हाळा पोलिसांनी पंचनामा केला. पन्हाळा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पन्हाळ्याचे सहाय्यक फौजदार एकनाथ गावंडे अधिक तपास करीत आहेत.

चौकट

७२० तक्रारदार
या मॅरेथॉनसाठी परराज्यातील स्पर्धकही आले होते. सुमारे ७२० तक्रारदारांची यादी पोलिसांकडे असून, वैभव आणि त्याच्या पत्नीने ८ लाख ६४ हजारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा तपास शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगवले करीत आहेत.