बिंदू चौक गार्डन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिंदू चौक गार्डन
बिंदू चौक गार्डन

बिंदू चौक गार्डन

sakal_logo
By

56859

बिंदू चौकातील तटबंदीवर
होणार व्हर्टिकल गार्डन

महापालिकेचा वेगळा प्रयत्न; निविदा अंतिम टप्प्यात

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः रोमांचकारी इतिहासाची आठवण करून देणारा आणि दिग्गज नेत्यांच्या तडाखेबंद भाषणांनी गाजलेल्या बिंदू चौकातील दणकट तटबंदीवर हिरवाईचा साज चढवला जाणार आहे. परिसरात येणाऱ्या भाविक, नागरिकांना सुखावह वाटणारी व्हर्टिकल गार्डनची उभारणी महापालिका त्या तटबंदीवर करणार आहे. त्यातून परिसरातील धुलीकण स्थिरावून या मध्यवर्ती ठिकाणच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
तेथील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या साक्षीने झालेल्या जाहीर सभा गाजल्या आहेत; पण बिंदू चौकातील तटबंदी ही त्या परिसराची मुख्य ओळख आहे. अजूनही तिथून आंदोलन, विविध उपक्रमांची सुरूवात केली जाते. अंबाबाईच्या दर्शनासाठी विविध भागांतून येणाऱ्या भाविकांनाही याच परिसरातून मंदिराकडे जावे लागते. तिथे वाहनतळ असल्याने वाहनांची प्रतीक्षा करत भाविक याच परिसरात थांबलेले असतात. तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने विविध कामाच्या निमित्ताने शहरवासीयांचा दिवसभर मोठा राबता असतो. या चौकात जाहीर सभांना बंदी आल्यानंतर महापालिकेने परिसराचे सुशोभीकरण केले. हेरिटेज लूक कायम ठेवण्यासाठी घडवलेल्या दगडांचा वापर करण्यात आला. तसेच आधुनिक पद्धतीची प्रकाश व्यवस्था करण्यात आली.
आता या सुशोभीकरणावर महापालिकेने निसर्गाचा साज चढवण्याचे ठरवले आहे. शहराचा मुख्य चौक असलेल्या परिसरात अपुऱ्या जागेमुळे हिरवळ वा शोभिवंत झाडे लावण्यास मर्यादा आहेत. चौकातील ती उणीव व्हर्टिकल गार्डन या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर केली जाणार आहे. अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानीपासून उत्तरेकडील बुरूजापर्यंत सरळ असलेल्या तटबंदीवर ही गार्डन साकारली जाणार आहे. जवळपास ८० फूट लांबीच्या या भागावर सहा फूट उंचीची गार्डन केली जाणार आहे. विविध प्रकारची शोभिवंत झाडे त्या गार्डनमधून लावली जाणार आहेत. त्यातून तटबंदीवर सहा फूट उंचीची हिरवाई तयार होणार असून, बिंदू चौकातून तटबंदी पाहताना पाठीमागील वस्तीचा भाग त्यामुळे लोपण्यास मदत होणार आहे. याबरोबरच तिथे वाहनांच्या असणाऱ्या प्रचंड वर्दळीमुळे वातावरणातील धुलीकणही ती हिरवाई थोपवून धरेल. त्यासाठी २० लाखांचा अंदाजित खर्च आहे. तीन निविदाही आल्या आहेत. त्यांची छाननी होऊन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

........
तीन वर्षे देखभाल
ज्या निविदाधारकाची निविदा निश्‍चित होईल, त्याने गार्डनची उभारणी करून तीन वर्षे त्याची देखभाल, दुरुस्ती करायची आहे. यामध्ये शक्यतो शोभिवंत झाडे लावली जाणार असून, त्यातून कायम टवटवीत हिरवाई दिसेल. त्यातून वातावरणातील धुलीकण व प्रदूषित घटक कमी होण्यास मदत होईल, असा उद्देश आहे.
........
कोट
शहरात प्रथमच ही संकल्पना राबवली जात आहे. त्यातून या गर्दीच्या ठिकाणी जागा नसतानाही गार्डन साकारता येणार आहे. आता निविदा अंतिम टप्प्यात आहे.
-समीर व्याघ्रांबरे, प्रभारी उद्यान अधिकारी.