सोना माळींनी जपला लाख मोलाचा वसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोना माळींनी जपला लाख मोलाचा वसा
सोना माळींनी जपला लाख मोलाचा वसा

सोना माळींनी जपला लाख मोलाचा वसा

sakal_logo
By

57076

सोना माळी यांनी जपला लाखमोलाचा ठेवा
३०० पेक्षा अधिक ओवी मुखोद्‌गत; शिवाजी विद्यापीठाकडून ध्वनिमुद्रण

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः कागलच्या सोना माळी यांना सुमारे ३०० पेक्षा अधिक ओव्या मुखोद्‌गत आहेत. यामध्ये संताच्या ओव्या आहेतच. मात्र, बहुतांशी ओव्या या नातेसंबंधांवरच्या, मानवी भावनांवरच्या आहेत. त्यांच्या रुपाने हा लाखमोलाचा ठेवा जतन झाला आहे. शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागांतर्गत असलेल्या राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्रात सोनाबाईंना मुखोद्‌गत असणाऱ्या सर्व ओव्यांचे त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करून ठेवले आहे.
ओवी हा लोकसाहित्याचा प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो. आजही ग्रामीण भागातील महिला काम करता करता ओवी गुणगुणतात. मात्र, अशा ओव्या मुखोद्‌गत असणाऱ्या महिलांची संख्या कमी होताना दिसते. या ओव्या म्हणजे आपला सांस्कृतिक ठेवा आहे. त्यामुळे तो जतन करणे आवश्यक आहे. कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयातील मराठी विषयाच्या प्राध्यापिका निला जोशी यांना माळी यांची माहिती समजली. त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राने माळी यांना विद्यापीठात बोलावले. त्यांना पाठ असणाऱ्या ३०० ओव्या त्यांनी ध्वनिमुद्रित केल्या. माळी यांचे वय ८० आहे. विठ्ठल, रुक्मिणी, दत्त, आंबाबाई, रेणुका, कृष्णा, गणपती, राम, सीता, मारुती, खंडोबा यांच्यावरील ओव्या त्यांना पाठ आहेत. तसेच विविध नातेसंबंधांवरील ओव्याही त्या म्हणतात. राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील ओव्यातून त्या शाहू चरित्र मांडतात.

चौकट
४९ कलाप्रकारांचे दस्ताऐवज बनवले
राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राचे काम कौतुकास्पद आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे ४९ कलाप्रकारांचे दस्ताऐवज बनवले आहेत. याचा सुमारे ६०० जी.बी.चा डाटा त्यांच्याकडे आहे. १४०० कलाकारांची यादी त्यांनी बनवली असून, ती शासनाला दिली आहे. लोककलांचे संकलन आणि संवर्धन करण्यासाठी आता महाविद्यालयांमध्ये सम्नवयकही नेमले जाणार आहेत.

कोट
ओवी हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास आहे. यामध्यमातून आपल्याला त्या त्या काळातील समाजजीवन अभ्यासता येते. त्या-त्या काळातील नातेसंबंध, चालीरिती समजावून घेता येतात. हा एकप्रकारचा अनमोल ठेवा असून, तो आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच सोना माळी यांच्या ओव्यांचे ध्वनिमुद्रण करून हा ठेवा जतन केला आहे.
- प्रा. डॉ. नंदकुमार मोरे
मराठी भाषा विभाग प्रमूख, शिवाजी विद्यापीठ