''गोडसाखर''च्या यंदाच्या हंगामावर प्रश्‍न चिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''गोडसाखर''च्या यंदाच्या 
हंगामावर प्रश्‍न चिन्ह
''गोडसाखर''च्या यंदाच्या हंगामावर प्रश्‍न चिन्ह

''गोडसाखर''च्या यंदाच्या हंगामावर प्रश्‍न चिन्ह

sakal_logo
By

''गोडसाखर''च्या यंदाच्या
हंगामावर प्रश्‍न चिन्ह
निविदा रद्दची चर्चा; कारखाना भाडेतत्त्‍वावर देण्यात अडचणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना दहा वर्षांसाठी भाडेतत्त्‍वावर चालविण्यास देण्याची ई-निविदा सातारा जिल्ह्यातील एकाच कंपनीने भरली होती. परंतु, तांत्रिक निविदा रद्द झाल्याचे खात्रीलायक समजते. यामुळे गोडसाखर भाडेतत्त्‍वावर चालवायला देण्याच्या प्रयत्नात अडचणी आल्या आहेत. परिणामी यंदाच्या हंगामावर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.
गोडसाखर कारखान्यावर प्रशासकीय मंडळ आहे. आर्थिक अडचणीतील कारखाना चालवण्यास देण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रशासकीय मंडळाने विशेष वार्षिक सभेसमोर हा विषय ठेवला. सभासदांनी तसा ठरावही मंजूर केला. ठरावासह दहा वर्षांचा मसुदा तयार करून मुख्य प्रशासक अरुण काकडे यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. नव्या सरकारमुळे यावरील निर्णय रेंगाळला. १५ सप्टेंबरच्या मंत्री समिती बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यानंतर साखर आयुक्तांनी ई-निविदा प्रसिद्ध केली. खटाव-माण तालुका अ‍ॅग्रो प्रोसेसिंग या एकाच कंपनीची निविदा आल्याने आयुक्तांनी निविदेला मुदतवाढ दिली. मुदतवाढीची निविदा १३ ऑक्टोबरला उघडण्यात आली. त्यातही या कंपनीची एकच निविदा होती.
दरम्यान, गोडसाखर १५ ते २० वर्षांच्या कालावधीसाठी चालवण्यास द्यावा आणि त्यानुसार निविदेत बदल करण्याची लेखी मागणी कंपनीने केली होती; परंतु निविदा उघडल्यानंतर कंपनीसोबत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत त्यांची निविदा रद्द केल्याचे सांगण्यात आले. किंबहुना कालावधी वाढीचा मुद्दा बाजूला पडला. आता गोडसाखरचा यंदाचा हंगाम कडू होण्याचे संकेत आहेत. यंदाचा हंगाम सुरू होण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यात पुन्हा वेळखाऊ निविदा प्रक्रियेची शक्यताही फारच कमी दिसत आहे. परिणामी शेतकरी सभासद व कामगारांची चिंता वाढली आहे.

चेंडू नव्या संचालकांच्या कोर्टात?
कारखाना भाडेतत्त्‍वावर चालवण्यास देण्याचा ठराव झाला. त्या वार्षिक सभेसंदर्भात दाखल एका याचिकेवरील निकालात निवडणुकीनंतर येणारे नवीन संचालक मंडळ पुन्हा विशेष वार्षिक सभा बोलावून चालवायला घेतलेल्या कंपनीबाबत फेरविचार करु शकते, असे म्हटले होते. दरम्यान, सध्या गोडसाखरची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून मतदानानंतर सत्तेवर येणाऱ्या संचालक मंडळाने कारखान्याच्या गळीत हंगामाबाबत निर्णय घ्यावा, असे मत आयुक्तांनी शासनाकडे पाठविल्याचे समजते.