
पाडळी खून
......
गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने
चार लाख ४० हजारांची फसवणूक
११ जणांवर गुन्हा; पाडळी खुर्द खूनप्रकरणी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः गुप्तधन मिळवून देतो, असे सांगून महिलेची चार लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. संबंधितांवर महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
किशोर भगवान लोहार (रा. शिरोली पुलाची), नामदेव शामराव पोवार (रा. जोगेवाडी,ता. राधानगरी), बाळू रामचंद्र सुतार (लक्षतीर्थ वसाहत), अक्षय अनिल हेगडे (रा. कंदलगाव, ता.करवीर), गजानन भगवान लोहार (शिरोली पुलाची), अनिल लक्ष्मण सुतार (रा. आळते, ता. हातकणंगले), नवनाथ शामराव सुतार (शिरोली पुलाची ), शशिकांत कांबळे (रा. उजळाईवाडी परिसर), राजन (पूर्ण नाव समजले नाही. रा. शिरोली पुलाची ), वैभव चौगुले (कसबा बावडा), फडणीस महाराज अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे उत्तरेश्वर पेठ येथील आरती सामंत यांचा खून झाल्याचा प्रकार ३० सप्टेंबरला उघडकीस आला. याप्रकरणी संशयित नामदेव पवार याच्यावर करवीर पोलिसांनी कारवाई केली. तपासात त्याने गुप्तधन शोधण्याच्या तगाद्याला कंटाळून हा प्रकार केल्याचे पुढे आले. याप्रकरणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जादुटोणाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
दरम्यान, संशयित किशोर व त्याच्या साथीदारांनी सामंत यांना गुप्तधन मिळवून देतो, तुम्ही आमचे ऐकले नाहीतर घरामध्ये असलेला नाग तुम्हाला त्रास देऊ शकतो, अशी भीती दाखवली. संशयितांनी जादुटोणा करण्याकरिता सामंत यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपये घेतले. त्यांच्या घरात खड्डा खोदून बकऱ्याचा बळी द्यायला लावला. पूजा करण्याकरिता ग्रंथ व मुळ्या देऊन पूजा न केल्यास मृत्यू होईल, अशी भीती घातली, अशी फिर्याद निरंजन दीक्षित यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
-----------