गरजूंना दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजूंना दिवाळी
गरजूंना दिवाळी

गरजूंना दिवाळी

sakal_logo
By

56266

घराची सजावट फुलवणार प्रसन्नतेचे ‘स्मित’
स्मिता मेहता यांच्याकडे उंबरा पट्टी, ‘शुभ-लाभ’ चिन्हासह विविध वस्तू उपलब्ध

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः दिवाळीसाठी गृहसजावटीच्या वस्तू खरेदीकडे सर्वांचा कल असतो. बाजारात आलेल्या नानाविध वस्तुंमुळे घराची सजावट आकर्षक करणे सोपे होते. महाद्वार रोडवरील मेहता बुक हाऊसच्या समोर स्मिता मेहता या नानाविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंची विक्री करतात. विविध आकार-उकार असलेली उंबरा पट्टी असो वा ‘शुभ-लाभ’ ही चिन्हे. सजावटीचे हरतऱ्हेचे प्रकार त्यांच्याकडे असून, एखाद्या गृहिणीला खास दिवाळीसाठी लागणारी वस्तू एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
स्मिता यांचे माहेर कोल्हापूर, सासर सोलापूर. सोलापूरमध्ये त्यांचा भांड्याचा व्यवसाय. कोविडच्या काळातील लॉकडाऊनमध्ये नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यातच पतीचे निधन झाले आणि त्यांच्या डोक्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला. अशा परिस्थितीतही स्मिता यांनी धैर्य दाखवत मुलाच्या शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले. येथे राहणाऱ्या भावाजवळच त्या राहू लागल्या. मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याच्या शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी हंगामी कामे करू लागल्या. गणेशोत्सवात सजावटीचे साहित्य विकू लागल्या. दिवाळीत लागणाऱ्या छोट्या आकाशकंदिलापासून फुलवाती, समई वाती, पोस्टर रांगोळी, रांगोळी बुधली, उंबरा पट्टी, लक्ष्मीची पावले, कलश अशा वस्तू त्यांनी विक्रीस ठेवल्या. दोन वर्षे कोरोनामुळे म्हणावा तितका व्यवसाय झाला नाही. कसेबसे गुंतवणुकीचे पैसे मिळाले. यंदा मात्र चांगली कमाई होईल आणि मुलाच्या शिक्षणाचा वाढता खर्च काढता येईल, अशी आशा त्यांना आहे. आपल्या वस्तू ग्राहकांनी खरेदी कराव्यात, अशी त्यांची भावना असली तरी आपल्याबरोबर इतर छोटे व्यावसायिकही दिवाळीसाठी असे छोटे-मोठे व्यवसाय करतात त्यांनाही मदतीचा हात देऊन त्यांच्याही छोट्या प्रयत्नांना बळ द्या.
एका छोट्याशा गाड्यावर त्यांनी सजावटीच्या सर्व साहित्यांची नेटकी मांडणी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना हवी ती वस्तू पटकन घेता येते. दिवाळीसाठी लागणाऱ्या अगदी छोट्या-छोट्या वस्तू त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे महिलांचे काम सोपे झाले आहे.
-
ठळक चौकट
‘शुभ दिवाळी’साठी येथून साहित्य घ्याच...
‘दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ या उक्तीप्रमाणे निरनिराळ्या प्रकारे दिवाळीचा आनंद प्रत्येकजण साजरा करतो. विक्रेत्यांचीही दिवाळी आनंददायी करण्यासाठी त्यांच्याकडून वस्तू खरेदी करूया...