
इचल:कुत्र्यांचे हल्ले सुरूच
दत्तवाडला माजी उपसरपंचावर
भटक्या कुत्र्यांचा हल्ला
इचलकरंजी, ता. १८ : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांचे हल्ले सुरू असून शेतकरी व नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. येथे शेतातच माजी उपसरपंचावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. प्रशासन उपाययोजनांएवजी बैठका घेवून सोपस्कर पार पडत आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव जाण्याची प्रतीक्षा करीत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
दत्तवाड ग्रामीण रुग्णालय दवाखान्याच्या मागे असलेल्या दानवाड रस्त्यावरील सिद्धनाळे मळा परिसरातच दोन वर्षात मोकाट कुत्र्यांनी हल्ले करून दोघांचा बळी तर चौघांना गंभीरित्या जखमी केले आहे. पुन्हा याच ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे ते बचावले. माजी उपसरपंच शिवाजी जाधव नेहमीप्रमाणे सकाळी ८:३० वाजता शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. उस पिकाची पाहणी करून परतताना उसातूनच सात ते आठ मोकाट कुत्रे त्यांच्या अंगावर धावून आले. त्यांनी ऊसाच्या सहाय्याने कुत्र्यांना रोखत रस्त्यापर्यंत आले. त्यामुळे सुदैवाने ते त्या हल्ल्यापासून बचावले. प्रशासनाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.