
जनता दल मागणी
सानुग्रह अनुदान पाच लाख द्यावे
जनता दलाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर,ता. १८ ः आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्याबाबत असलेले जुने नियम व अटी बदलाव्यात, तसेच सानुग्रह अनुदान पाच लाख द्यावे, अशी मागणी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पुरूळेकर यांनी केली. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यासाठी शासनाने नियम अटी २००५ ला जाहीर केल्या. त्यानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज राष्ट्रीयकृत बॅंक, परवानाधारक सावकार, सहकारी संस्थेचे असावे ते थकीत असावे, या कर्जाच्या वसुलीबाबत तगादा लावला असल्याचा पुरावा असावा. शेतीसाठीचे कर्ज असावे, अशा अटी आहेत. प्रत्यक्ष स्थिती वेगळी असू शकते. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कर्ज काढावे लागते. अशात एखाद्या शेतकरी कुटुंबातील तरुण मुलाने आत्महत्या केली तर आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नावे शेती असावी, हा निकष लावला जातो. तेव्हा तरुणाचा जीव गेला असूनही सानुग्रह अनुदान मिळत नसल्याने वरील निकष बदलावा. अनुदानाची रक्कम तुटपुंजी आहे, ती वाढवून पाच लाख रुपये देण्यात यावी. परूळेकर यांच्यासह वसंत पाटील, शहराध्यक्ष मधुकर पाटील यांनी निवेदन दिले.