...तर शेतकरी-कामगार देशोधडीला ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर शेतकरी-कामगार देशोधडीला !
...तर शेतकरी-कामगार देशोधडीला !

...तर शेतकरी-कामगार देशोधडीला !

sakal_logo
By

...तर शेतकरी-कामगार देशोधडीला !
‘गोडसाखर’चे कवित्व; गळीत हंगामापेक्षा राजकारण ठरतेय वरचढ
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या प्रक्रियेला कंपनीची निविदा रद्द केल्याने तूर्त तरी पूर्णविराम मिळाल्यासारखे आहे. यामुळे शेतकरी आणि कामगारांना गोडसाखरच्या गळीत हंगामाची चिंता सतावू लागली आहे. आता निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खुर्चीसाठी राजकीय शत्रूशी हातमिळवणी करतानाही मागे-पुढे न पाहणार्‍यांचे राजकारण गळीत हंगामापेक्षाही वरचढ ठरत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुळात आतापर्यंत गोडसाखरचे लचके मोठ्या प्रमाणात तुटलेले आहेत. यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला नाही तर जी काही उरली-सुरली अवशेषं असतील ती सुद्धा संपुष्टात येण्याची भिती आहे. शेतकरी-कामगारांची अर्थवाहिनी असलेला हा कारखाना अडचणीत येण्यामागची कारणे व चुका अनेक आहेत. त्या चुका कोणाकडून झाल्या तेही सर्वश्रृत आहे. यामुळे कारखान्याचे लचके कोणी तोडले, हा प्रश्‍न जितका महत्वाचा आहे, किंबहुना त्यापेक्षा अधिक शेतकरी-कामगारांच्या नजरेतून यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्याला प्राधान्य देण्याचा आहे. कारखाना सुरु करण्यासाठी संघटीत प्रयत्न झाला नाही तर प्रामुख्याने शेतकरी आणि कामगारच देशोधडीला लागणार आहेत यात शंका नाही.
मुळात शेकडो कामगार दीड वर्षापासून बिनपगारी घाम गाळत आहेत. बहुतांशी अल्पभुधारक असलेल्या तालुक्यातील उत्पादक शेतकर्‍याला आपला ऊस कुठे गाळायचा, या प्रश्‍नाने गतवर्षीप्रमाणेच यंदाही सतावणार आहे. बाहेरच्या कारखान्याला ऊस पाठविताना किती नाकीनऊ येते, याचा अनुभव शेतकर्‍यांनी गतवर्षीच घेतला आहे. राजकारणासाठी वेळोवेळी कामगार व शेतकरी हिताच्या बाता मारणार्‍यांचे संघटन आता गोडसाखरची चाके फिरवण्यासाठी आवश्यक आहे. अशा लोकांच्या मनात कामगार व शेतकऱ्यांप्रती किती हीत व प्रेम आहे, याचे दुध का दूध-पाणी का पाणी दाखवण्याची ही वेळ आहे. गोडसाखरचा ’दौलत’ होवू देणार नाही असे सांगताना अनेकांनी अप्रत्यक्षपणे चंदगडच्या दौलतला हिणवले. काही वर्षापासून दौलत सुरळीत सुरु झाला. याच दौलतला हिणवणारे आता गोडसाखरसाठी काय करणार, असा प्रश्‍न शेतकरी-कामगारांतून विचारला जात आहे.

चौकट...
हंगामाचे आव्हान कायम
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व साखर कारखान्यांचा हंगाम सुरु होईल. त्याचवेळी गोडसाखर निवडणुकीचा निकाल लागेल. प्रशासकांनी आपल्या परीने ई-निविदेची प्रक्रिया राबविली. एकाच कंपनीची आलेली निविदा रद्द झाल्यानंतर गोडसाखर हंगामाचे भविष्य नव्या संचालक मंडळाच्या हाती देवून आयुक्तांनी आपले मत शासनाला कळविले आहे. पुन्हा निविदेची प्रक्रिया करणे म्हणजे नोव्हेंबर महिना संपणार आहे. फेरनिविदा प्रक्रिया राबविली तरी उशिरा गाळप करण्यास कोणी तयार होईल, असे वाटत नाही. यामुळे गोडसाखरचा यंदाचा हंगाम सुरु करण्याचे आव्हान कायम आहे.