फटाकेमुक्त दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फटाकेमुक्त दिवाळी
फटाकेमुक्त दिवाळी

फटाकेमुक्त दिवाळी

sakal_logo
By

‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी यंदाही पुढाकार
व्यापाऱ्यांना पत्रे पाठवली, फटाके न वाजविणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन दिवस सहल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः यंदाही फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पना शालेय विद्यार्थ्यांनी उचलून धरली आहे. सातशेहून अधिक पोस्टकार्डे पाठवून त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील व्यापारी व दुकानदारांना लक्ष्मीपूजन, वही पूजनावेळी मोठ्या प्रमाणावर फटाके उडवू नयेत, असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे टपाल खातेही या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले असून, यंदा विद्यार्थ्यांना या विभागाने मोफत पोस्टकार्डे दिली आहेत. दरम्यान, येथील निसर्गमित्र संस्थेच्या पुढाकाराने फटाके न वाजवणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी दोन दिवसीय जंगल सहलीचे नियोजन होणार आहे.
दिवाळीच्या निमित्ताने आतषबाजीचा प्रकाशोत्सव ही पूर्वापार चालत आलेली परंपरा असली तरी गेल्या काही वर्षांत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांचा उत्सव साजरा करताना फटाकेमुक्त सण साजरा करूया, अशी संकल्पना पुढे आली आणि ती जिल्ह्यात यशस्वी होऊ लागली आहे. प्रदूषणाचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो, याबाबतची जागृती विविध माध्यमातून होत असून, महापालिका, जिल्हा परिषदेसह खासगी शाळांतही हा उपक्रम राबवला जात आहे.

कोट
गेल्या पंचवीसहून अधिक वर्षे हा उपक्रम सुरू आहे. परिणामी फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पना अनेक घरांत यशस्वी झाली आहे. फटाके न उडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदाही दोन दिवसांची जंगल भ्रमंतीची सहल आयोजित केली जाणार आहे.
- अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्गमित्र.

कोट
शालेय वयातच मुलांमध्ये पर्यावरणाचे भान येण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. गेली काही वर्षे मी या उपक्रमात सहभागी होत असून, यंदाही मित्रांसह माझा सहभाग राहणार आहे. दिवसेंदिवस या उपक्रमातील विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे.
- देवेंद्र पाटील, विद्यामंदिर हणमंतवाडी.

ठळक चौकट
सकारात्मक ऊर्जेचा प्रकाशोत्सव...
दीपोत्सव म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा प्रकाशोत्सवच. तिमिरांतून तेजाकडे जाण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची परंपरा बदलत्या काळातही कायम आहे. मात्र, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढू लागले. साहजिकच पर्यावरण संवर्धनाबरोबरच फटाक्यांमुळे झालेले विविध अपघात, त्याचे दुष्परिणाम याबाबतही या उपक्रमातून प्रबोधन केले जाते.