थकबाकीदार शासकीय कार्यालये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीदार शासकीय कार्यालये
थकबाकीदार शासकीय कार्यालये

थकबाकीदार शासकीय कार्यालये

sakal_logo
By

मोठ्या थकबाकीदारांत ५० सरकारी कार्यालये
पाणीपुरवठा विभागाची कारवाई सुरू; प्रयत्न करूनही वसुली नाही

कोल्हापूर, ता. १८ ः महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या मोठ्या थकबाकीदारांमध्ये ५० सरकारी कार्यालयांचा समावेश असून, त्यांच्या ३१० कनेक्शनची २२ कोटी १७ लाखांची थकबाकी आहे. त्यातीलही दहा विभागांची २१ कोटी ६३ लाख थकबाकी आहे. त्यामध्ये १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ३१ मार्च रोजीची ही थकबाकी असून, आजतागायत त्यात काहीही फरक पडलेला नाही.
पहिल्या दहा कार्यालयांमध्ये १२ ग्रामपंचायतींची ७ कोटी ७८ लाख सर्वाधिक थकबाकी आहे. त्यानंतर सीपीआरची ७ कोटी ४१ लाख, रेल्वेची दोन कोटी १५ लाख, पाटबंधारे वारणाची एक कोटी २१ लाख, शिवाजी विद्यापीठची ९४ लाख ४० हजार, पाटबंधारे पंचगंगाची ८० लाख १६ हजार, सार्वजनिक बांधकामची ७८ लाख १६ हजार, जिल्हाधिकारी कार्यालयाची २७ लाख ४५ हजार, जिल्हा परिषदेची १५ लाख ८५ हजार, टेलिफोनची १० लाख सहा हजाराची थकबाकी आहे. या कार्यालयांकडे वारंवार प्रयत्न करूनही त्याची वसुली झालेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा थकबाकीचा आकडा एकदम मोठा वाटत आहे.
शहरातील १ लाख १९ हजार ४३१ थकबाकीदारांपैकी हे ११ टक्के खरे थकबाकीदार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मत आहे. यामध्ये झोपडपट्ट्यांमधील कनेक्शनचाही समावेश आहे. या दोन्हीकडील १३ हजार १०८ थकबाकीदारांकडे एकूण थकबाकीपैकी ८३ टक्के थकबाकी आहे. त्याची रक्कम ५९ कोटी ४५ लाखांवर आहे.
एक लाखांवर थकबाकी असलेल्यांची संख्या २७२ आहे. ५० हजार ते एक लाखावरील १२९८, २५ हजार ते ५० हजारावरील ३४१८, १० हजार ते २५ हजारापर्यंतचे ८१२० थकबाकीदार आहेत.

चौकट
३४ टक्के नागरिकांचा नियमित भरणा
६६ हजार २९२ जणांकडे १७ टक्के थकबाकी आहे. त्यांची रक्कम ११ कोटी ८७ लाखांवर आहे. ही संख्या पाहता ३४ टक्के नागरिक नियमित बिल भरत असून, त्यांची संख्या ४००३१ इतकी आहे.