
दिवाळी वातावरण
57302
........
खरेदीसाठी कोल्हापूरकरांची सहकुटुंब गर्दी
पावसाची तमा न बाळगता दिवसभर खरेदीचा उत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः दिवाळीच्या यंदाच्या खरेदीउत्सवात पावसाने व्यत्यय आणला असला तरी त्याची तमा न बाळगता दिवसभर कोल्हापूरकर सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. पाऊस आला किंवा नाही आला तरी आवश्यक सर्व खबरदारी घेऊन विक्रेत्यांनीही आता स्टॉल लावले आहेत. आज दुपारी पावसाने हजेरी लावली मात्र सायंकाळनंतर पूर्णपणे उघडीप दिली. त्यामुळे महाद्वार रोडसह प्रमुख बाजारपेठांत रात्री उशिरापर्यंत गर्दी राहिली.
कोल्हापूरच्या एकूणच बाजारपेठेचा विचार केला तर कोणत्याही सणासाठी सायंकाळनंतर खरेदीवर अधिक भर दिला जातो. मात्र, गेली आठवडाभर सायंकाळनंतरच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांना खरेदीचा बेत रद्द करावा लागला. दिवाळी सणालाच आता दोन-तीन दिवस उरल्याने पावसाची कुठलीही तमा न बाळगता खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
....
यंदा आकाश‘छंदील’
गेले काही दिवस सततच्या पावसामुळे ‘यंदा उटणं लावून फक्त अंगणात बसायचं’ अशा मेसेजीसचा सोशल मीडियावर ट्रेंड राहिला. मात्र, आता यंदा ‘आकाश‘छंदील’ लावायचा, असा मेसेज व्हायरल होत असून, आकाशछंदिलावरही यंदा छत्री लावावी लागली तरी चालेल, पण दीपोत्सव पारंपरिक उत्साहातच साजरा होणार, अशी सकारात्मक मानसिकता, त्यातून प्रकर्षाने दिसत आहे. बाजारपेठेतील स्टॉलनीही छत्र्यांसह प्लास्टिक कागदांचे संरक्षण घेतले असून, ग्राहकही छत्र्या, रेनकोट घेऊनच खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत.