कोल्हापूर - सांगली महामार्गच वाहतुकीसाठी धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - सांगली महामार्गच वाहतुकीसाठी धोकादायक
कोल्हापूर - सांगली महामार्गच वाहतुकीसाठी धोकादायक

कोल्हापूर - सांगली महामार्गच वाहतुकीसाठी धोकादायक

sakal_logo
By

2295
अतिग्रे : कोल्हापूर-सांगली महामार्गावर असणाऱ्‍या खड्ड्यात जाऊन अपघात होऊ नये, यासाठी येथे बॅरिकेड लावावे लागत आहेत.
२२९४
चोकाक : चोकाककडून हेर्लेच्या दिशेने खड्डे बुजवण्याचे काम घाईगडबडीत झाल्याने काही खड्डे तसेच आहेत. बुजवलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी नव्याने खड्डे होत आहेत.

लोगो -
कोल्हापूर - सांगली महामार्ग
मृत्यूचा सापळा

१०७५ खड्डे
एकदम ‘ओके’!
पहिल्या सोळा किलोमीटरमध्ये रस्त्याची चाळण

अभिजित कुलकर्णी / सकाळवृत्तसेवा
नागाव, ता. १८ : कोल्हापूर-सांगली महामार्ग जणू मृत्यूचा सापळा झाला आहे. इकडचा खड्डा चुकविताना तिकडच्या खड्ड्यात वाहनधारक हमखास जाऊन आदळत आहेत. त्यामुळे हा महामार्ग एक प्रकारे खड्ड्यातच गेला आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. पुलाची शिरोली येथील सांगली फाटा ते हातकणंगले या सोळा किलोमीटरच्या टप्प्यात तब्बल १०७५ मोठे खड्डे आहेत. कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ६९१ खड्ड्यांचा सामना करावा लागतो, तर सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ३८४ खड्ड्यांचा सामना करावा लागतो.
संपूर्ण वर्षाचा आढावा घेतल्यास सांगली फाटा ते हातकणंगले दरम्यान दिवसाआड एक अपघात ठरलेला आहे. शिरोली आणि हातकणंगले पोलिस ठाण्यात सर्वच अपघात नोंद होतात, असे नाही. तरीही शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या मार्गावर तिघे ठार, तर सतरा जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त मोटारसायकलवरून खड्डा चुकविताना स्वतः पडून जखमी झाल्याने तक्रार कोणाविरुद्ध द्यायची, असा प्रश्न असतो आणि अशाच जखमींची संख्या खूप मोठी आहे. बहुतेक अपघात खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात किंवा वाहन खड्ड्यात गेल्याने चालकाचा ताबा सुटून होत आहेत. सांगली फाटा येथे तर दोन वेळा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट मार्बल शोरूममध्ये घुसले आहेत. त्यामुळे कोल्हापूर-सांगली महामार्गच वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
एम. डी. इन्फ्रा या कंपनीकडून खड्डे भरून डांबरीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे; पण हे योग्यप्रकारे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेकडो खड्डे मुरुम टाकून बुजविण्यात आले. जेथे काम झाले आहे, तेथेही नव्याने पुन्हा खड्डे तयार होत आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने दुभाजकाजवळ महामार्ग उभ्या लाटांसारखा भासत आहे. हे तर सर्वाधिक जीवघेणे आहे. त्यावरून दुचाकीस्वार घसरून किंवा संतुलन बिघडून पडत आहेत. महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच रस्त्याची परिस्थिती पाहता याची डागडुजी करण्याऐवजी पुनर्निर्माण हाच पर्याय समोर दिसतो आहे.


कोल्हापूर-सांगली महामार्गाचा पायाच चुकीचा आहे. दुभाजकाविरुध्द दिशेला रस्त्याचा उतार हवा. तो नसल्याने महामार्गाच्या मध्यभागी पाणी साचत आहे. अनेक ठिकाणी गतिरोधक कोणत्याही नियमात बसणारे नाहीत. सांगली फाटा ते हातकणंगले या टप्प्यात हालोंडी, मौजे वडगाव, हेले, माले, चोकाक, मुडशिंगी, रुकडी, अतिग्रे, रामलिंग असे दहा फाटे आहेत. या दाही ठिकाणी महामार्गावर अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे शास्त्रीय भाषेत याला ब्लॅक स्पॉटच म्हणावे लागेल.
- डॉ. विवेक शेटे, आर्किटेक्चर अॅण्ड स्ट्रक्चरल डिझाइनमधील तज्ज्ञ

तात्पुरती तरतूद म्हणून कोल्हापूर-सांगली मार्गावरील खड्डे मुरुम टाकून बुजवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाऊस संपताच मुरुम काढून खड्डे डबर व खडीने भरून डांबरीकरण करण्यात येतील.
- सुशांत पाटील, संचालक; एम डी इन्फ्रा

फोटो ओळ
अतिग्रे : कोल्हापूर : सांगली महामार्ग असणाऱ्या खड्ड्यात जाऊन अपघात होऊ नये यासाठी येथे बॅरिकेड लावावे लागतात.
चोकाक : चोकाककडून हेरलेच्या दिशेने खड्डे बुजवण्याचे काम घाईगडबडीत झाल्याने काही खड्डे तसेच आहेत, तर जे खड्डे बुजवलेत ते पुन्हा नव्याने निर्माण होत आहेत.