संजय डी पाटील लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय डी पाटील लेख
संजय डी पाटील लेख

संजय डी पाटील लेख

sakal_logo
By

इंट्रो -
राजकारण, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवून या सर्वांपासून अलिप्त होणे हे तसे सोपे नाही. पण पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांनी हे लिलया करून दाखवले. आजही त्यांचा जीवनप्रवास पाहिला की नवनिर्मितीची ऊर्जा मिळते. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण काही ना काही शिकविणाराच आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्‍वाचे दादा आज ८८ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्‍वातील मला भावलेले पैलू ...
......................

अखंड ऊर्जेचा स्रोतः पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) हे नाव साऱ्या देशाला माहिती आहे. पण त्यांच्या मोठेपणामागची तपश्चर्या फार कमी लोक जाणतात. कारण दादा कधीही आत्मप्रौढीच्या फंदात पडले नाहीत. एखाद्या गोष्टीवर सखोल विचार करायचा, त्याबाबतच्या सर्व बाजूंची माहिती घ्यायची. मग सूक्ष्म नियोजन करायचे. एकाग्रचित्ताने नियोजित कार्य पार पाडायचे, हा दादांचा स्वभाव आहे. अखंड ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या दादांनी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मनापासून केली आणि त्यामध्ये आपली वेगळी ओळखही निर्माण केली.
दादा तसे पैलवान. तालमीतल्या मातीत जसे त्यांनी शरीर कमावले तसे कणखर मन आणि मनगटही तयार केले. त्यांचा दृढनिश्चय पाहिला की हे लक्षात येते. प्रारंभी १८० विद्यार्थ्यांचे एक अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांनी सुरू केले. आज १६२ महाविद्यालये, ७६ हजार विद्यार्थी आणि १२ हजार कर्मचारी इतका व्याप वाढला आहे. दादांचा स्वभाव मुळातच आक्रमक आणि धाडसी आहे. या जोरावरच त्यांनी राजकारणात उडी घेऊन अल्पावधीत आपला दबदबा तयार केला. त्यांचा दबदबा इतका होता की एकदा संजय गांधी त्यांना म्हणाले की, ‘ तुम्ही एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार’. पण नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. नृसिंहवाडीचे पाटील महाराज यांनी त्यांना शिक्षणक्षेत्रात कार्य करण्याचा सल्ला दिला. आणि ऐनभरात आलेले राजकारण सोडून त्यांनी शिक्षणक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. समाजातील गोरगरिबांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या सामाजिक जाणिवेतून त्यांनी काम केले. दादांनी फीमध्ये सवलत दिल्यामुळेच इंजिनिअर, डॉक्टर होऊ शकलो असे म्हणणारे हजारो विद्यार्थी मला नेहमी भेटतात. मला सुरुवातीपासूनच त्यांचा सहवास मिळाला. त्यांच्याबरोबर राहून मी निरीक्षणातून अनेक गोष्टी आत्मसात केल्या. तळसंदे येथील २०५ एकर जमीन मी १४८ शेतकऱ्यांकडून विकत घेतली. इतका अवघड व्यवहार मी सुरळीत पार पाडला. कोणाचीही एका पैशाची तक्रार आली नाही. ही गोष्ट दादांना फार भावली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सर्व कारभार एक हाती माझ्याकडे दिला. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कधीही कोल्हापुरातील कामात लक्ष घातले नाही. एखादे काम विश्वासाने त्यांनी एखाद्याकडे दिले की ते कधी त्यात हस्तक्षेप करत नाहीत. राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय यातील काहीही करा पण सेवा हेच सूत्र असले पाहीजे, असा त्यांचा शिरस्ता आहे. असे असले तरी संस्थांचे कामकाज कसे सुरू आहे. कुटुंबातील कोणती व्यक्ती काय करते आहे याची तपशीलवार माहिती त्यांच्याकडे असते. कुटुंबातील प्रत्येकावर ते जिवापाड प्रेम करतात. हवं नको त्याची चौकशी करतात. नातवंडांबरोबरच परतंवंडांवरही त्यांचा जीव आहे. सतेज पाटील मंत्री झाले तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. ऋतुराज आमदार झाल्यावरही त्यांनी समाधान व्यक्त केले. आपली तिसरी पिढीही कर्तृत्ववान असल्याचे समाधान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते.
नम्रता हा त्यांचा एक मोठा गुण सर्वांनीच घेण्यासारखा आहे. ज्यांनी त्यांना विरोध केला आज ते त्यांचे जिवलग मित्र आहेत. दादांनी अत्यंत कष्टातून आणि संघर्षातून हे साम्राज्य उभारले. मुलांना स्वकर्तृत्वावर उभे राहण्यास प्रेरणा केले. राजकारण, शिक्षण या दोन्ही क्षेत्रातील उत्तुंगता त्यांनी सर केली. पण आज या दोन्ही क्षेत्रांपासून ते अलिप्त आहेत. त्यांचा ओढा अध्यात्माकडे अधिक असून जीवनाची सार्थकता ते अनुभवत आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि विचार यामुळे आम्ही सारे कुटुंबीय सर्वच क्षेत्रात यशस्वी ठरलो आहोत. आम्हा सर्व भावंडांना वडील म्हणून त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
.................

- संजय डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ)