रस्ता समाप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता समाप्त
रस्ता समाप्त

रस्ता समाप्त

sakal_logo
By

2305
पुलाची शिरोली : येथे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच उभारण्यात आलेले टोल गेट शेड.

लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे
सामान्यांच्या पदरी नैराश्यच

दुरवस्थेचे दुखणे एक तपाहून अधिक काळ कायमच

निवास चौगले / सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः कोल्हापूर-सांगली महामार्गाचे दुखणे एक तपाहून अधिक काळचे आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावाचा त्याला मोठा फटका बसतो आहे. प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून वाहनधारकांनी चांगल्या रस्त्याच्या अनुषंगाने काही एक सुविधा पदरात पाडून घेतल्या तरी त्या तात्पुरत्याच ठरल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे यातील अपयश अधिक ठळक दिसते आहे.
रत्नागिरी ते नागपूर महामार्ग अशी या मार्गाची ओळख आहे. प्रत्यक्ष त्यावरून प्रवास केला तर याला खरोखरच महामार्ग म्हणायचे का, इतकी वाईट स्थिती आहे. गेल्या पंधरा वर्षांत आमदार, खासदार, मंत्री अशांसह सर्वच लोकप्रतिनिधींचे ताफे या रस्त्यावरून गेले आहेत. त्यांना या मार्गाचा कोणताही फटका बसलेला नाही. मात्र, सर्वसामान्य वाहनधारकच यात भरडला गेला आहे. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे सामान्य मात्र मेटाकुटीला आले आहेत. हा रस्ता आणखी किती बळी घेणार, असा सवाल विचारला जात आहे.

दररोज कोल्हापूर ते सांगली आणि परत प्रवास करणाऱ्या अनेकांना अनेकदा त्यांची चूक नसतानाही अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे सांगली फाटा ते अंकली (जि. सांगली) हा प्रवास म्हणजे अडथळ्यांची शर्यत पार करीत, सुखरूप पोचलो अशी स्वतःलाच शाबासकी देणे होय. सांगली फाटा ते तमदलगे आणि तमदलगे ते अंकली अशा दोन टप्प्यांत महामार्गाची विभागणी होते. दोन्ही टप्प्यांतील वाहनधारकांचे अनुभव भिन्न असले तरी दोन्हीकडे धोकाच आहे. मार्ग भारतीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यावर ग्रहण सुटेल, अशी अपेक्षा होती. उलट समस्येत भरच पडली. त्यात अपघातांचे प्रमाण असेल, कमी वेळेत सर्वाधिक अंतर पार करणे आणि इंधन खर्चात बचत असेल. महामार्गाने वाहनधारक आणि प्रवाशांची घोर निराशाच केल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.
प्राधिकरणाची महामार्गासाठी नियमावली आहे. यातील एकाही नियमाचे पालन झाले आहे काय, असा विचार तुमच्या मनात नक्कीच येईल. राष्ट्रीय महामार्गाची बांधणी भोवतालच्या भूपृष्ठभागापेक्षा एक मीटरने उंच असावी लागते. तो नियम येथे दिसत नाही. परिणामी, अनेक ठिकाणी पाणी साचते. महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना उतार अशी बांधणी असते. ती येथे दिसत नाही. समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाशझोत डोळ्यांवर पडू नये, यासाठी दुभाजकावर लावलेले प्रकाशरोधक कमी उंचीचे असल्याने त्याचाही उपयोग होत नाही.
आता अभ्यासांती निर्णयांची गरज
सांगली फाटा ते तमदलगेदरम्यान चौपदरीकरण झाले. मात्र, शेकडो खड्डे आणि हातकणंगले येथील अपुरे उड्डाणपुलाचे काम, अनेक ठिकाणी असणारी वळणे व गतिरोधक कुठल्या नियमावलीत बसतात, असा प्रश्नही वाहनधारकांचा आहे. त्यामुळे आता डागडुजी करण्याऐवजी अभ्यासपूर्व विस्तार आणि पुनर्बांधणी गरजेची आहे.
(समाप्त)
...................
फोटो ओळ
पुलाची शिरोली : येथे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच उभारण्यात आलेले टोल गेट शेड.
....................................................................................