प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक
प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक

प्राप्तीकर अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक

sakal_logo
By

प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगत
८० लाखांची रोकड लुबाडली
---
चौघांचे कृत्य; पाठलाग करीत शिरोली एमआयडीसी मार्गावर प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून चौघांनी दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील ८० लाख १३ हजारांची रोकड असलेली बॅग काढून घेतली. त्यानंतर चौघेही दुचाकीस्वाराला सांगली फाट्यावर सोडून फरारी झाले. गांधीनगर, रुईकर कॉलनी ते शिरोली एमआयडीसी मार्गावर बुधवारी (ता. १९) सकाळी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
पोलिसांनी सांगितले, की धनाजी आनंदा मगर हे नागाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे राहतात. त्यांची गांधीनगर येथील संतोष कुकरेजा यांच्याशी ओळख आहे. कुकरेजा यांचा फूटवेअरचा व्यवसाय आहे. मगर हे बुधवारी (ता. १९) सकाळी कुकरेजा यांच्या दुकानात ठेवलेली ८० लाख १३ हजारांची रक्कम घेऊन दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. दरम्यान, दोन मोटारसायकलवरींल चौघांनी त्यांचा पाठलाग केला. चौघांनी त्यांना मुक्त सैनिक वसाहत येथे अडविले. ‘तू लै फास्ट आलास?’ अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी ‘आम्ही प्राप्तिकर अधिकारी आहोत’ असा बहाणा करीत ‘तुझ्याकडे किती पैसे आहेत? काय आहे ते दाखव,’ असे दरडावले. चौघे त्यांना शिरोली एमआयडीसीच्या दिशेने घेऊन गेले. तेथे त्यांच्याकडील पैशांची बॅग फसवून काढून घेतली. त्यानंतर त्यांना सांगली फाटा येथील महामार्गावर सोडून दिले, अशी फिर्याद मगर यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक राजेश गवळी आणि उपनिरीक्षक श्वेता पाटील तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही आधारे तपास
परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चार भामट्यांचा स्वतंत्र पथकाद्वारे शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.