तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सराफाचे लुबाडले ८० लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी 
सराफाचे लुबाडले ८० लाख
तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सराफाचे लुबाडले ८० लाख

तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सराफाचे लुबाडले ८० लाख

sakal_logo
By

सुधारित........
००००००००००००
तोतया प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी
सराफाचे लुबाडले ८० लाख
चौघांचे कृत्य; शिरोली एमआयडीसी रस्त्यावर प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवत चौघांनी सराफ व्यावसायिकाला अडवून त्याच्याकडील ८० लाख १३ हजारांची रोकड असलेली बॅग काढून घेतली. त्यानंतर चौघेही त्या सराफाला सांगली फाट्यावर सोडून फरारी झाले. गांधीनगर, रुईकर कॉलनी ते शिरोली एमआयडीसी मार्गावर बुधवारी (ता. १९) रात्री हा प्रकार घडला आहे. त्याबाबत आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी सांगितले, की धनाजी आनंदा मगर हे नागाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे राहतात. ते, सराफ व्यवसायिक आहेत. त्यांची गांधीनगर परिसरातील ‘संतोष’ नावाच्या व्यावसायिकाशी ओळख आहे. त्यांचा फूटवेअरचा व्यवसाय आहे. मगर व्यवसायासंबधी कोल्हापुरात आले होते. ते बुधवारी (ता. १९) रात्री ‘संतोष’ यांच्या दुकानात ठेवलेली ८० लाख १३ हजारांची रक्कम घेऊन दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. दरम्यान, रात्री सव्वा दहाच्या सुमारास दोन मोटारसायकलवरींल चौघांनी त्यांचा पाठलाग केला. चौघांनी त्यांना मुक्त सैनिक वसाहत येथे अडविले. ‘तू लै फास्ट आलास?’ अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी ‘आम्ही प्राप्तिकर अधिकारी आहोत’ असा बहाणा करीत ‘तुझ्याकडे किती पैसे आहेत? काय -काय आहे ते दाखव,’ असे दरडावले. चौघे त्यांना शिरोली एमआयडीसीच्या दिशेने घेऊन गेले. तेथे त्यांच्याकडील पैशांची बॅग फसवून काढून घेतली. त्यानंतर त्यांना सांगली फाटा येथील महामार्गावर सोडून दिले, अशी फिर्याद मगर यांनी दिली. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याला भेट देत तपासाबाबत सूचना केल्या. पोलिस निरीक्षक राजेश गवळी आणि उपनिरीक्षक श्वेता पाटील तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही आधारे तपास
शाहूपुरी पोलिस या प्रकाराचा सर्व अंगाने तपास करीत आहेत. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला आहे. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू आहे. संशयित भामट्यांचा स्वतंत्र पथकाद्वारे शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.