दिवाळी खरेदी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी खरेदी गर्दी
दिवाळी खरेदी गर्दी

दिवाळी खरेदी गर्दी

sakal_logo
By

फोटो ः मोहन मेस्त्री
.......................


खरेदीच्या आनंदोत्सवात दीपोत्सव सुरू
---
गर्दीचा उच्चांक; रविवार ठरला खरेदीचा ‘सुपर संडे’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी आज शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलले. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमधील रस्त्यांवरील गर्दीने उच्चांकी उलाढाल केली. सर्वसामान्यांचा आधार असलेला महाद्वार रोडच नव्हे, तर मॉल्स, शोरूम्समध्येही अलोट गर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तर दुकानांबाहेर रांगा लागल्याचे चित्र होते. आज पावसाने उसंत दिल्याने खरेदी उत्सवाला उधाणच आले.
नवे कपडे, वस्तू खरेदीसाठी सकाळपासूनच महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, छत्रपती शिवाजी महाराज रोड, जोतिबा रोड, शाहूपुरी परिसरात गर्दी होती. गेले आठवडाभर खरेदीसाठी गर्दी होत होती, मात्र या गर्दीने आज उच्चांकच मोडला. रस्त्यावरील तयार कपड्यांच्या विक्रीपासून ते दुकाने, शोरूम, मॉलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची रीघ लागली. रांगोळी, सौंदर्य प्रसाधने, सेंट, कपबशी, चप्पट, बूट खरेदीसाठीही महिलांची गर्दी होती. स्वस्तात मस्त बाजारानेही गर्दी खेचली. शंभर रुपयांना दागिना, पाच रुपयांना नेलपेंट, दहाला दोन मेंदी कोन इथपासून ते ४०० रुपयांच्या सेंटपर्यंत खरेदी करणारा वर्ग आज महाद्वार रोडवर दिसत होता. उटण्यांपासून मोती साबण, आयुर्वेदिक साबणाच्या खरेदीला पसंती होती. घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद होता. मोबाईल शॉपी, भांडी, दूरचित्रवाणी संच, फ्रीज या वस्तूंसाठी शिवाजी स्टेडियम, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथील शोरूम्समध्ये गर्दी होती. अनेकांनी आज वस्तू पसंत करून नोंदणी केली. पाडव्याच्या मुहूर्तावर या वस्तू घरी नेल्या जाणार आहेत.
......

फटाक्यांना मागणी
बच्चेकंपनीची दिवाळी म्हणजे फटाके उडविणे. त्यासाठी विविध प्रकारच्या फटाक्यांची खरेदी करण्यासाठी बच्चेकंपनीसह पालकांनीही बागल चौक, पापाची तिकटी परिसरातील फटाके स्टॉलवर गर्दी केली. प्रदूषण टाळण्यासाठी आलेल्या कमी आवाजाच्या फटाक्यांची विक्रीही जोरात झाली. त्याप्रमाणे फुलबाजे, भुईचक्कर, पाऊस, लवंगी अशा फटाक्यांना सर्वाधिक मागणी होती. फटाक्यांच्या माळा, चिमणी तोटा असे फटाकेही काहींनी खरेदी केले.