महापालिकेची वेबसाईट अपडेट केंव्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेची वेबसाईट अपडेट केंव्हा
महापालिकेची वेबसाईट अपडेट केंव्हा

महापालिकेची वेबसाईट अपडेट केंव्हा

sakal_logo
By

महापालिका लोगो

संकेतस्थळावर जुनेच अधिकारी
शहरवासीयांना मनस्ताप; बदली, पदोन्नतीने बदलल्यानंतरही नावे तशीच
कोल्हापूर, ता. २४ : कोणाची पदोन्नती झाली, कोणाची बदली झाली, कोणाची जबाबदारी बदलली तरी महापालिकेच्या संकेतस्थळावर अजूनही अनेक जुने अधिकारीच विभागप्रमुख म्हणून दाखवले जात आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांची बदली होऊन वर्ष उलटत आले आहे. त्यामुळे महापालिकेची इत्यंभूत माहिती देणाऱ्या संकेतस्थळावरील जुन्या माहितीने शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एखाद्या संस्थेचे संकेतस्थळ म्हणजे आवश्‍यक माहिती एका क्लिकसरशी देण्याचा मार्ग आहे. महापालिका तर साडेपाच लाख शहरवासीयांची संस्था आहे. शहराबाबतची माहिती तिथे उपलब्ध असावी याबरोबरच एखादी समस्या भेडसावत असल्यास त्याबाबत कोणाशी संपर्क साधायचा याचीही माहिती तिथून मिळत असते. प्रशासनात विविध २१ विभाग आहेत. त्यातील प्रमुखांबरोबरच इतर अधिकाऱ्यांची तसेच त्या विभागातर्फे देणाऱ्या सुविधांची माहिती संकेतस्थळावर विभागनिहाय आहे. कोरोनानंतर प्रशासनाचे कामकाज नियमित झाले आहे. नगरसेवक नसल्याने शहरवासीय विविध प्रश्‍न घेऊन अधिकाऱ्यांकडे येत आहेत. अशा स्थितीत अनेकजण संकेतस्थळावरील माहिती घेऊन महापालिकेत येतात. एखाद्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याचे नाव विचारत महापालिकेची इमारत फिरतात. त्या अधिकाऱ्याची भेट झाल्यास तो आता माझ्याकडे तो विभाग नाही असे सांगतो व नवीन अधिकाऱ्याचे नाव देतो. त्याचा शोध नागरिक घेतात. काही अधिकारी तर बदली होऊन दुसरीकडे गेले आहेत. त्याची माहिती महापालिकेत आल्यानंतर काहींना होते. २१ विभागांपैकी सहा विभागाचे अधिकारी बदलले आहेत. पण अजूनही जुन्याच अधिकाऱ्यांची नावे संकेतस्थळावर आहेत. सहाय्यक आयुक्त विद्यादेवी पोळ व संदीप घार्गे हे दोन अधिकारी बदलून गेले आहेत. पण सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीत प्रशासकांसमवेत त्यांची नावे अजूनही संकेतस्थळावर आहेत.
-------------------

विभाग*संकेतस्थळारील नाव* कार्यरत अधिकारी
केएमटी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक*चेतन कोंडे*टीना गवळी
आरोग्याधिकारी*डॉ. प्रकाश पावरा*डॉ. रमेश जाधव
परवाना*राम काटकर*शिवप्रसाद माजगावकर
एलबीटी*विलास साळोखे*विश्‍वास कांबळे
उद्यान*अनिकेत जाधव*समीर व्याघ्रांबरे
वर्कशॉप*सचिन जाधव*चेतन शिंदे