शहरात चोरट्यांची ‘दिवाळी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात चोरट्यांची ‘दिवाळी’
शहरात चोरट्यांची ‘दिवाळी’

शहरात चोरट्यांची ‘दिवाळी’

sakal_logo
By

शहरात चोरट्यांची ‘दिवाळी’
धूम स्टाईलने चार ठिकाणी प्रकार; १२ तोळे दागिन्यांवर डल्ला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, उजळाईवाडी ता. २४ ः दिवाळी दिवशीच महिलांच्या अंगावरील तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने मोटारसायकलस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. टेंबेरोड, राजारामपुरीसह उजळाईवाडी परिसरात भरदिवसा हे प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी नाकाबंदीसह वेगवेगळ्या पथकाद्वारे चोरट्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. जुना राजवाडा, राजारामपुरी आणि गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

पोलिसांनी सांगितले, की राजारामपुरी पहिल्या गल्लीतील अपार्टमेंटमध्ये एक सेवानिवृत्त महिला कुटुंबासोबत राहते. त्या आज सकाळी साडेआकराच्या सुमारास अपार्टमेंच्या बोळात पतीसोबत बोलत पायी जात होत्या. दरम्यान, दुचाकीवरून दोघे जण त्यांच्यासमोर आले. त्यातील मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे छोटे मंगळसूत्र आणि तीन ग्रॅमचे पदक असे एकूण तीन तोळे आठ ग्रॅम वजनाचे दागिने हिसडा मारून हिसकावून नेले. याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.

कणेरी (ता. करवीर) परिसरातील एक महिला आज राजारामपुरी मेनरोडवरील एका ज्वेलर्स दुकानात खरेदीसाठी गेली होती. त्या सोने खरेदी करून सायंकाळी साडेचारच्या सुमारास बाहेर पडल्या. दरम्यान, समोरून काळ्या दुचाकीवरून दोघे त्यांच्यासमोर आले. त्यांनी हिसडा मारून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याचीही नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.
टेंबेरोड येथील एक महिला आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रायव्हेट हायस्कूलमार्गे मंगळवार पेठेतील त्यांच्या दुकानाकडे जात होत्या. दरम्यान, त्यांच्या समोरून अचानक एका सोनेरी मोपेडवरून दोघे आले. त्यांनी हिसडा मारून त्यांच्या गळ्यातील पावणेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि एक तोळ्याचे मणीमंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर ते दोघे क्षणात पसार झाले. संबंधित महिलेने आरडाओरडा केला. तसे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेतला; मात्र ते हाती लागले नाही. नागरिकांनी जुना राजवाडा पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला. यासंदर्भात संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादेनुसार दोन लाख रुपयांचे दागिने लुटीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

उजळाईवाडी (ता. करवीर) येथे विद्या शिवदास या राहतात. त्या बेकरीत नोकरी करतात. त्या आज सायंकाळी पाचच्या सुमारास कामावरून घरी जात होत्या. त्यांच्याजवळ अचानक दोघे दुचाकीस्वार आले. त्यांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व रवी माठाचे मणी असे दीड तोळे वजनाचे दागिने हिसडा मारून हिसकावून नेले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. सहायक फौजदार खोत तपास करीत आहेत.

चौकट
वर्णानावरून शोध सुरू
टेंबेरोड येथे दागिने लुटणाऱ्या एकाने अंगात काळा शर्ट, तर दुसऱ्याने तपकिरी शर्ट घातला होता. दोघांनी तोंडाला मास्क बांधल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार लुटारूंचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकट
पाच लाखांहून अधिकचा ऐवज लंपास
मोटारसायकलस्वार चोरट्यांनी एकाच दिवशी ५ लाखांहून अधिक किमतीचे १२ तोळेहून अधिकच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. दिवाळी दिवशीच घडलेल्या प्रकारामुळे महिलांवर्गात घबराट पसरली आहे.

चौकट -
सीसीटीव्हीत संशयित कैद
एकापाठोपाठ घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांनी शहरासह परिसरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली. दरम्यान, घटनास्थळाचे सीसीटीव्हीही तपासले. यामध्ये संशयित कैद झाले असून, हे कृत्य चौघांनी केले असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत असून, संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------