अंबाबाई काकडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई काकडा
अंबाबाई काकडा

अंबाबाई काकडा

sakal_logo
By

58528
कोल्हापूर ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात परंपरेप्रमाणे दिवाळीपासून पहाटे काकडा प्रज्वलित केला जातो. सोमवारपासून या विधीला प्रारंभ झाला.

काकड्याने उजळले
अंबाबाई मंदिराचे शिखर
त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत भल्या पहाटे चालणार विधी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः श्री अंबाबाई मंदिरातील काकडा प्रज्वलित करण्याच्या विधीला आज पहाटेपासून प्रारंभ झाला. तुपात भिजवलेली पेटती मोठी ज्योत (काकडा) मंदिराच्या शिखराच्या टोकावर ठेवण्याचा हा विधी असून हा पेटता काकडा हातात घेऊन मंदिराच्या शिखरावर चढवला जातो. हा विधी त्रिपुरारी पौर्णिमपर्यंत चालू राहणार असून तो पाहण्यासाठी पहाटे दोनपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे.
प्रत्येक वर्षी दिवाळीच्या पहाटे या काकडा विधीला प्रारंभ होतो. तेथून पुढे पंधरा दिवस रोज पहाटे दोन वाजता काकडा मंदिराच्या शिखरावर चढवला जातो. त्यामुळे पुढचे पंधरा दिवस मंदिर भाविकांसाठी पावणेदोन वाजल्यापासूनच उघडले जाईल. आज पहाटे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, रोषणनाईक निवास चव्हाण, खजिनदार महेश खांडेकर, मंदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, प्रसाद लाटकर, संजय जाधव, संतोष खोबरे यांच्या उपस्थितीत विधी झाला. मंदिराचे शिखर साधारणपणे चाळीस फूट उंच आहे. एवढ्या उंच शिखरावर केवळ शिखराच्या दगडी टप्प्यांचा आधार घेत चढावे लागते. एका हातात पेटता काकडा व दुसऱ्या हाताने दगडी टप्प्याला धरत शिखरावर एका दमात पोहोचावे लागते. पहाटे मंदिराच्या शिखरावर काकडा चढवताना थंडीचे आगमन आलेले असते. किंबहुना हिवाळा ऋतूची या विधीपासूनच सुरुवात होते. त्यामुळे काकडा चढवण्यासाठीचे कौशल्य फार महत्त्वाचे ठरते. दरम्यान, या काळात देवीची पालखी रात्री पावणेनऊला निघणार आहे.
------------
चौकट
सूर्यग्रहण काळातील विधी
दिवाळीनिमित्त आज श्री अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. उद्या (मंगळवारी) खंडग्रास सूर्यग्रहण असून, ग्रहण पर्वकाळ एक तास सहा मिनिटांचा आहे. त्यामुळे माध्यान्ह पूजेनंतर अलंकार पूजा होणार नाही, माध्यान्ह पूजेस दूध-साखरेचा नैवेद्य असेल. देवीस स्पर्शस्नान (सायंकाळी चार वाजून ५७ मिनिटांनी) व मोक्षस्नान (सायंकाळी सहा वाजून ३१ मिनिटांनी) होईल. या काळात धार्मिक अनुष्ठान सुरू राहणार असून त्यानंतर सायंकालीन नित्य विधी होतील, अशी माहिती श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाने दिली.