एचआयव्ही बाधितांना आधार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एचआयव्ही बाधितांना आधार!
एचआयव्ही बाधितांना आधार!

एचआयव्ही बाधितांना आधार!

sakal_logo
By

एचआयव्ही बाधितांना आधार!
‘संजय गांधी’चा १४६० जणांना लाभ; १६२१ रुग्णांना एसटी पासची सुविधा
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : एड्स हे नाव जरी घेतले तरी माणूस नकळतपणे चार हात दूर जातो. कोण स्वत:च्या तर कोण दुसऱ्याच्या चुकीमुळे या चक्रव्यूहात अडकलेला. त्यांना समाजातून अपवादानेच आधार मिळतो. अशा एचआयव्ही बाधितांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. येथील एआरटी सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एक हजार ४६० जणांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे. एक हजार ६२१ रुग्ण एसटीच्या पासची सुविधा घेत आहेत.
एड्स या आजाराची लागण झाली म्हणजे मृत्यू हे एकेकाळी समीकरण बनलेले होते. कारण, त्यावर रामबाण उपाय नाही. आजही हीच परिस्थिती असली तरी त्यावर उपचार पद्धती विकसित झाली आहे. ज्यामुळे एचआयव्ही बाधितांचे आरोग्य चांगले ठेवणे शक्य होत आहे. बाधितांचा ओढावणारा मृत्यू कित्येक वर्षांपर्यंत लांबवणेही यातून शक्य झाले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एचआयव्ही बाधितांवर उपचार केले जातात. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यासह लगतच्या कागल, भुदरगड व हुक्केरी तालुक्यातील काही रुग्ण याच ठिकाणी उपचार घेतात. सध्या १८०० रुग्ण उपचार घेत आहेत.
एचआयव्ही बाधितांना उपचारासोबतच अन्य सोईसुविधा देण्याचा प्रयत्न शासनामार्फत सुरु आहे. एचआयव्ही बाधितांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जातो. सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या तुलनेत अटीमध्ये एचआयव्ही बाधितांना शिथिलता आहे. एआरटी सेंटरकडून त्यांची नावे थेट संजय गांधी योजना समितीचे सचिव तथा तहसीलदारांना पाठवली जातात. आतापर्यंत एक हजार ४६० जणांना या योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कष्टाची कामे करणे अडचणीचे ठरते. अशा रुग्णांना या रकमेचा मोठा आधार मिळत आहे.
तसेच एसटी महामंडळाकडून एचआयव्ही बाधितांना पास दिला जातो. या रुग्णांना उपचारासाठी प्रवास करावा लागतो. त्याचा आर्थिक भार रुग्णांवर पडू नये यासाठी पासची सवलत दिली जात आहे. एक हजार ६२१ रुग्ण या सवलतीचा लाभ घेत आहेत. प्रत्येक रुग्णाला स्वत:च्या गावापासून ते गडहिंग्लजपर्यंतच्या प्रवासासाठी या पासचा वापर करता येतो. महिन्यातून दोन वेळा येता-जाता मोफत प्रवास करता येतो. त्यामुळे रुग्णांकडून पैशाअभावी होणारी उपचारातील चालढकल कमी झाली आहे.