टोप जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोप जागा
टोप जागा

टोप जागा

sakal_logo
By

L58700

टोपमधील जागा ताब्यात,
मनपाचे काम मात्र संथ

लॅंडफिल साईट; शहरातील कचरा संकलनावर परिणाम

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः कचऱ्यातील इनर्ट मटेरियल टाकण्यासाठी जागा नाही म्हणून कसबा बावडा येथे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले. लॅंडफिल साईटसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई जिंकून टोप येथील जागा पदरात पाडून घेतली. ताबा घेऊन चार महिन्यांचा कालावधी गेला तरी अजून संरक्षक भिंतीचीच प्रक्रिया सुरू केली आहे. लॅंडफिल साईटसाठीच्या एजन्सीबाबतची चर्चा अजून प्राथमिक पातळीवर आहे. एकीकडे शहरातून संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी जागा नसल्याने पुन्हा डोंगर साठत असून, दुसरीकडे ताब्यात असलेल्या जागेबाबत प्रशासनाकडून संथ काम सुरू आहे. त्याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर होत आहे.
महापालिकेतर्फे झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवला होता. प्रक्रिया केल्यानंतर इनर्ट मटेरियल मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. त्याचा पर्यावरणाला धोका नसला तरी ते टाकण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने लॅंडफिल साईट विकसित करावी लागते. त्याकरिता महापालिकेने जागा शोधल्या; पण ग्रामीण भागातून विरोध झाला. जवळपास पंधरा वर्षांपासूनचा हा प्रश्‍न आहे. शेवटी टोप येथील जागा महापालिकेला न्यायालयातील लढा जिंकून मिळाली. जागेसाठीच्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जागा ताब्यात मिळाल्यानंतर तातडीने कामाला सुरुवात करण्याची अपेक्षा होती; पण चार महिन्यांनंतर फक्त संरक्षक भिंतीसाठीची निविदा प्रसिद्ध करण्यापर्यंत प्रशासनाची मजल गेली आहे.
लॅंडफिल साईट विकसित करण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज असून, तिच्याकडून साईट विकसित केल्यानंतरच इनर्ट मटेरियल टाकता येते. यासाठी एखाद्या वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्याची निविदा प्रक्रिया तातडीने राबवली असती तर एकाचवेळी कामांना सुरुवात करून महापालिकेची जागा तयार झाली असती. सध्या कसबा बावडा येथे साठत चाललेले कचऱ्याचे डोंगर तातडीने हलवण्यात येऊन योग्य प्रकारे कचऱ्यावर प्रक्रिया करता आली असती. दररोज येणारा कचरा, प्रक्रिया करणाऱ्या कंपनीने गुंडाळलेला गाशा त्यामुळे प्रक्रिया कमी होत आहे. त्यातून शहरातून संकलित केलेला कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने कचरा संकलनावर परिणाम होत आहे.

चौकट
टाकाळा येथील काम थांबलेलेच
टाकाळा खणीत लॅंडफिल साईट विकसित करण्याचे काम महापालिकेने दिले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; पण नंतर विरोध झाल्यानंतर तेथील सर्व प्रक्रियाच ठप्प झाली. त्यासाठी काही प्रयत्न झाल्याचे दिसले नाहीत. खणीमध्ये टाकलेल्या कॉंक्रीटचे काम लोपले जात आहे.

कोट
टोप येथील जागेसाठी संरक्षक भिंत उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. लॅंडफिल साईट विकसित करण्यासाठी तांत्रिक बाबींचा विचार केला जात आहे.
-रविकांत आडसूळ, उपायुक्त, महापालिका