फायर यंत्रणेची सक्ती आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फायर यंत्रणेची सक्ती आवश्यक
फायर यंत्रणेची सक्ती आवश्यक

फायर यंत्रणेची सक्ती आवश्यक

sakal_logo
By

फायर यंत्रणेची सक्ती आवश्यक
प्राथमिक स्वरुपात आग विजवण्यास मदत; इचलकरंजीत उपकरणांचा अभाव
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २५ : दीपावलीसारख्या सणसुदीमध्ये फटाके, दिवे यामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. परिणामी यावेळी अग्निशामक दलास सतर्क राहावे लागते. या कालावधीमध्ये शहरात तीन आगीच्या घटना घडल्या. घटनास्थळी आग शमवणारे यंत्र नसल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. शहरात विविध ठिकाणी स्क्रॅप साहित्य, वेस्टेज सूत, वेस्टेज कोन त्यासह कापूस, कार्टन ठेवण्याची गोदामे आहेत. छोटे कारखाने, सायझिंग यांची संख्याही अधिक आहे. मात्र यामधील बहुतांश ठिकाणी प्राथमिक स्वरुपातील आग विझवण्यासाठी असणाऱ्‍या उपकरणांचा अभाव दिसतो. त्यामुळे अग्निशमन यंत्र ठेवण्याची सक्ती तसेच वापरण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे बनले आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने येथे दाट वस्ती वसली आहे. शहर परिसराची लोकसंख्या सुमारे ४ लाखांच्या घरात आहे. शहराचा मुख्य व्यवसाय वस्त्रोउद्योग असल्याने त्याच्यावर आधारीत इतर व्यवसायांची संख्या ही अधिक आहे. शहर परिसरामध्ये चार इंड्रस्टीयल इस्टेट असून त्यामध्ये ८० प्रोसेस, २०० सायझिंग, १ लाख २५ हजार यंत्रमाग कारखाने आहे. त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्‍या वेस्टेजचे प्रमाण अधिक आहे. ते ठेवण्यासाठी शहर परिसरामध्ये व्यावसायिक पत्र्याची शेड उभी करत आहेत. आग जलद पकडणारे वेस्टेज असतानाही येथे आगीपासून बचाव करणारी यंत्रणा दिसत नाही. त्यामुळे अनेक छोट्या आगीसाठीही आग्निशामक वाहनास पाचारण करावे लागते. या कलावधीत आग रौद्ररूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे फायर सिलेंडर, फायर बॉलसारखी यंत्रणेचा वापर आवश्यक बनला आहे. फायर बॉल आगीची शक्यता असणाऱ्या ठिकाणी प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे. प्राथमिक स्वरुपात असलेली आग कोणाच्याही मदतीशिवाय विझवणे शक्य होत आहे. ३ ते ५ सेकंदात आगीची तीव्रता ७० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर फायर बॉलचा स्फोट होता. कोणाच्या मदतीशिवाय आग प्रभावीपणे विझवली जाते. या फायर बॉलचे प्रभावी क्षेत्र ३ घनमीटर आहे. त्यासोबत फायर सिलेंडर हाही प्रथम स्वरुपातील आगीवर प्रभावी आहे. स्क्रॅप साहित्य, वेस्टेज सूत, वेस्टेज कोन त्यासह कापूस, कार्टन ठेवण्याची गोदामे, छोटे कारखाने, सायझिंग यांना या उपकरणांची सक्ती करणे आवश्यक बनले आहे.
------------
अनेक गोदामे फायर सुरक्षेशिवाय
इचलकरंजी-चंदूर मार्गावरील ओढ्यानजीक असलेल्या गुंज व स्क्रॅपच्या गोदामांना आग लागून कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले होते. येथे प्रथम स्वरुपातील आग विझवण्याचे उपकरण नसल्याने आग वाढली असल्याचे निदर्शनास आले. शहराच्या सीमा भागात अनेक ठिकाणी गोदामे आहेत. मात्र बहुतांशी गोदामांमध्ये आग प्रतिबंध उपकरणांचा अभाव व बंदीस्त बांधकाम असल्याने आगीची शक्यता अधिक बळावते.
--------
कोट
शहरात दाटीवाटीची वस्ती असल्याने घटनास्थळी फायर यंत्रणा पोहोचवण्याकरिता काही वेळ होतो. अशा वेळी प्राथमिक स्वरुपात असलेली आग मोठी होण्याची शक्यता असते. कारखाने, गोदामे, यासह अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी फायरसिलेंडर, फायर बॉल ठेवल्यास आगीच्या सुरवातीस नियंत्रण मिळू शकते व होणारे नुकसान टळू शकते.
-संजय कांबळे, अग्निशामक विभाग प्रमुख, महापालिका