जयंती नाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंती नाला
जयंती नाला

जयंती नाला

sakal_logo
By

58945

जयंती नाला ओसंडणे सुरूच
गाळ काढण्याबाबत प्रशासन कडक भूमिका घेत नसल्याचे चित्र

कोल्हापूर, ता. २८ ः पावसामुळे ओसंडून वाहत असलेला जयंती नाला महापालिकेला आजही थांबवता आलेला नाही. आठवड्यापासून पाऊस थांबला असला तरी महापालिकेच्या अनास्थेमुळे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. बंधाऱ्याजवळ साठलेला गाळ काढण्याबाबत प्रशासनाकडून कडक भूमिका घेतली जात नसल्याने सांडपाण्याची स्थिती कायम आहे.
सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी तीन पंपाद्वारे उपसा करूनही सांडपाणी ओसंडून वाहत आहे. जवळपास ७५ एमएलडी सांडपाणी उपसले जात आहे. त्यामुळे उपसा दररोजच्या क्षमतेपेक्षा जास्त होत आहे. परिणामी इतर कारणांचा महापालिकेने विचार करायला हवा आहे. जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मते पात्रात गाळ असल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पाणी वाहत आहे. १५ ऑक्टोबरनंतर महापालिकेने जयंती नाल्याचे बरगे लावले; पण त्यानंतरही पाऊस सुरू राहिल्याने बंधाऱ्यावरून सांडपाणी ओसंडून वाहत होते. दिवाळीमध्ये पाऊस थांबल्याने नाला वाहण्याचा थांबेल, अशी अपेक्षा होती. त्यानंतरही पाणी थांबले नसल्याने प्रक्रिया प्रकल्पाकडे पाणी नेण्यासाठी शेवटी तीनही पंप सुरू करून उपसा वाढवला. बुधवारपासूनही तशीच परिस्थिती कायम आहे. पातळी थोडी कमी झाल्यानंतर पात्रामध्ये गाळ साठून राहिल्याचे दिसून आले.
ज्या विश्‍वा इन्फ्रा कंपनीकडे सांडपाणी उपसण्याची व ओसंडून वाहून देण्याची जबाबदारी आहे, त्यांना दोन दिवसांपासून जेसीब वा पोकलॅंड मिळत नाही ही बाब पटत नाही. तसेच महापालिकेनेही सांडपाणी रोखण्यासाठी कडक भूमिका घेतलेली नाही. यामुळे दोन्ही यंत्रणांवर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याचेच दिसत आहे.

चौकट
प्रदूषणाची काळजी?
जयंती नाल्यातील बरगे काढल्यास सांडपाणी थेट नदीत जाऊन प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो याची काळजी यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आहे. पण, गेल्या आठवड्यापासून तेच सांडपाणी बरगे न काढताही वाहत आहे, ते तातडीने रोखले पाहिजे याचा विचार केला जात नाही. दोन दिवस पाणी कमी होईल हेच सांगितले जात आहे. हा विचार म्हणजे ‘दरवाजा उघडा...’ असा प्रकार आहे.